रानटी हत्तीच्या कळपाचे पुनरागमन ; ‘या’ परिसरातील धानपीक, झोपड्यांची नासधूस

GADCHIROLI TODAY
गडचिरोली :  रानटी हत्तींच्या कळपाने छत्तीसगड राज्यातून धानोरा तालुक्यातील मुरूमगाव पूर्व वन परिक्षेत्रात प्रवेश करीत जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती आहे. दरम्यान या रानटी हत्तींनी धानोरा तालुक्यातील खोब्रामेंढा परिसरात शेत पिकांसह झोपड्यांची नासधूस केल्याची माहिती आहे.
मागील एक वर्षापासून जिल्ह्यातील गडचिरोली वनवृत्तातील धानोरा, मुरुमगाव, देसाईगंज, कुरखेडा, कुरखेडा तालुक्यात धुमाकुळ घालणा-या रानटी हत्तींचे कळपाने परत छत्तीसगड राज्याच्या दिशेने प्रवास केला होता. दरम्यान पुन्हा या रानटी हत्तीच्या कळपातील काही सदस्यांनी पुन्हा जिल्ह्यात प्रवेश केला आहे. तालुक्यातील मालेवाडा वनपरिक्षेत्रात या कळपातील काही हत्तींचे दर्शन घडले आहे. धानोरा तालुक्यातील खोब्रामेंढा येथील शेतक-यांनी लागवड केलेल्या उन्हाळी धान पिकांची तसेच शेतातील झोपड्यांची नासधूस केली. यामुळे शेतक-यांसह नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर हत्ती पुन्हा छत्तीसगड राज्यातून धानोरा तालुक्यातील मुरूमगाव पूर्व वनपरिक्षेत्रात प्रवेश केला आहे. तेथून मालेवाडा वन परिक्षेत्रातील नियतक्षेत्र तलवारगडच्या जंगलात दाखल झाले. या परिसरातील गांगसाय टोला मार्गाने 15 एप्रिलच्या रात्री खोब्रामेंढ नियतक्षेत्रात येऊन संपत पोरेटी व घनचू पोरेटी रा. खोब्रामेंढा यांनी लागवड केलेल्या उन्हाळी धान पिकाची नासधूस केली. त्यानंतर 16 एप्रिल रोजी रात्री खोब्रामेंढा येथील कुमारशहा कुंजाम यांच्या धान शेतीचे व रामसू पोरेटी यांच्या शेतातील झोपड्यांची नासधूस केली. रानटी हत्तींनी शेतक-यांचे मोठे नुकसान केले आहे. सध्या रानटी हत्तींचा कळप येडसकूही उपक्षेत्रातील कक्ष क्रमांक 358 मध्ये असल्याची माहिती मालेवाडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेहर यांनी दिली आहे. सोबतच धानोरा तालुक्यातील मालेवाडा वनपरिक्षेत्रात दाखल झालेला रानटी हत्तींचा हा केवळ अर्धाच कळप आहे. अर्धा कळप छत्तीसगड राज्यात आहे. तो सुद्धा जिल्ह्यात प्रवेश करू शकतो. त्यामुळे नागरिकांनी हत्तींच्या जवळ जाऊ नये, किंवा चिथावणीखोर कृत्य करू नये, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेहर यांनी केले.