विजेचा धक्का बसताच खांबावरून खाली कोसळला कामगार युवक

GADCHIROLI TODAY
कोरची : तालुक्यातील बेतकाठी फिडर मधील जामणार ते बोरी गावाच्या विद्युत वाहिनीवर बिघाड दुरुस्तीचे काम करण्यासाठी विद्युत खांबावर चढलेल्या कामगाराला वीजेचा धक्का बसताच तो २० फूट खाली कोसळून गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री 7:30 वाजताच्या दरम्यान घडली. मिथुन गिरधारी आंडुलवार (30) रा. बिहटेकला असे गंभीर जखमी कामगार युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, जामणारा व बोरी गावाच्या विद्युत वाहिनीवर बिघाड झाल्याने दुरुस्तीसाठी कंत्राटदारामार्फत कामगार मिथून हा एका विद्युत खांबावर चढून काम करीत असताना त्याला अचानक विद्युत धक्का बसला. त्यामुळे तो 20 फूट खांबावरून खाली कोसळला. यात त्याच्या कमरेला जोरदार मार लागला तर डाव्या हाताला जखम झाली. यावेळी बेतकाठी फिडरचे लाईनमेन नंदकिशोर अलोने सोबत होते. फिडरवरील एबी स्विच लॉक न केल्याच्या कारणामुळे हा वीजेचा धक्का मिथुनला बसला असल्याचे बोलले जात आहे. जखमी मिथुनला तत्काळ घटना स्थळावरून महावितरणचे सहायक अभियंता प्रफुल कुडसंगे यांच्या मदतीने कोरची ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. आशिष इटनकर, डॉ. अभय थुल यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रात्री 102 रुग्णवाहिकेने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले.