शेतकऱ्यांमध्ये अवकाळीची धडकी ; पुन्हा चार दिवस येलो अलर्ट

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. सध्या धान पीक फुटणे सुरु झाले आहे. येत्या 15 दिवसात काही शेतकऱ्यांचे धानपीक कापणी योग्य होणार आहेत. मात्र, हवामान विभागाने पुन्हा चार दिवस येलो अलर्ट दिल्याने शेतकऱ्यांमध्ये अवकाळीची धडकी भरली आहे.
मागील महिन्यात जिल्ह्यात विविध भागात वादळी वा-यासह अवकाळी पाऊस, गारपीट झाली होती. या अवकाळीचा उन्हाळी धान पिकासह रब्बी पिकांना जबर फटका बसला होता. यात जिल्हाभरातील 1 हजार 257 हेक्टरवरील जिरायत, बागायत, फळपिकांचे नुकसान झाले होते. आता पुन्हा एप्रिल महिन्यात हवामान विभागाने जिल्ह्याला 19, 20 व 22, 23 एप्रिल असा चार दिवसांचा येलो अलर्ट दिला आहे. दिलेल्या इशाऱ्यानुसार बुधवारी सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल घडून येत ढग दाटून आले आहेत. अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा धानपिकासह आंबा पिकालाही जबर फटका बसण्याची शक्यता आहे.