दारू विक्रेत्यांच्या घरापुढेच महिलांनी वाजविला ‘बँडबाजा’

मीचगाव खुर्द येथील अवैध दारूविक्री विरोधात ग्रामस्थ एकवटले
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील मीचगाव खुर्द येथील अवैध दारूविक्रेत्यांना वारंवार सूचना व नोटीस देऊनही अवैध व्यवसाय सुरूच आहे. परिणामी घरातील कर्ता पुरुष तांदूळ, कोंबड्या विकून दारूचे व्यसन पूर्ण करीत असल्याने अखेर त्रस्त झालेल्या मीचगाव बुज व मीचगाव खुर्द येथील गाव संघटनेच्या महिलांनी दारूविक्रेत्यांच्या घरापुढे ‘बाजा बजाओ आंदोलन’ करून लक्ष वेधले. सोबतच यापुढे अवैध व्यवसाय करणार नाही अशा आशयाच्या शपथपत्रावर सहा विक्रेत्यांची स्वाक्षरी घेतली.
मिचगाव बूज येथील मुक्तिपथ गाव संघटनेने अथक परिश्रम घेऊन गेल्या 6 वर्षापासुन दारू बंद केली आहे. मात्र, शेजारीच असलेल्या मीचगाव खुर्द येथे सुरु असलेल्या अवैध दारूविक्रीमुळे मीचगाव बूज येथील मद्यपी या गावात दारू पिण्यासाठी जातात. या गावात मुजोर सहा दारु विक्रेते आहेत. सदर विक्रेते गावाला न जुमानता दारू विक्री करीत आहे. आताच्या घडीला मीचगाव खुर्द या गावात दारू विक्रीचे प्रमाण अधिक वाढले आहे. परिणामी गावातील तरुण मुले व्यसनाच्या विळख्यात अडकत आहेत. अनेक महिला दारूमुळे विधवा झाल्या आहेत. दारू पिणारे घरातील तांदूळ, घरावरचे कवेलू, कोंबड्या विकून आपले व्यसन पूर्ण करतात व महिलांना त्रास देत आहेत.
या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुक्तिपथ, दोन्ही गावातील संघटनेच्या महिला व ग्रामस्थांची बैठक पार पडली. या बैठकीत मिचगाव खुर्द या गावातील अवैध दारूविक्रीमुळे होणाऱ्या नुकसानबाबत आत्मचिंतन करण्यात आले. तसेच ‘पुरुष दारू प्यावे व महिला मार खावे’ अस कुठे लिहला आहे काय ? असा गंभीर प्रश्न महिलांनी उपस्थित केला. त्यानंतर दोन्ही गावांनी मिळून अवैध दारूविक्री बंदीचा सामुहिक निर्णय घेतला. सदर निर्णयाची अंमलबजावणी करीत ग्रामस्थांनी गावात बँड वाजवत रॅली काढून दारू विक्री बंद करण्याचा संदेश दिला. सोबतच दारूविक्रेत्यांच्या घरापुढे ‘बाजा बजाओ आंदोलन’ करीत अवैध व्यवसाय बंद करण्याची ताकीद देत दारूविक्रेत्यांकडून शपथपत्र लिहून घेण्यात आला.
या अनोख्या आंदोलनात मीचगाव खुर्द येथील पोलिस पाटील रामचंद्र कुदेशी, ग्रामसभा उपाध्यक्ष बाबुराव नरोटे, ग्राम पंचायत सदस्य सुशांत उईके, मुक्तीपथ तालुका संघटक अक्षय पेद्दीवार, तालुका प्रेरक भाष्कर कड्यामी, मुक्तीपथ कार्यकर्ते राहुल महाकुलकर यांच्यासह दोन्ही गावातील गाव संघटनेच्या महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.