गडचिरोली-गोंदिया सी-60 पथकाचे संचलन ठरले सर्वोत्कृष्ट

महाराष्ट्र दिनी होणार चषकाचे वितरण
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : प्रजासत्ताक दिनी मुंबई येथे झालेल्या संचलनात गडचिरोली पोलिस दल व गोंदिया पोलिस दलाच्या सी-60 पथकाने संयुक्तरित्या गौरवास्पद कामगिरी करीत प्रथम क्रमांकाचे चषक पटकाविले आहे. या चषकाचे वितरण 1 मे महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनी अपर पोलिस महासंचालक (प्रशासन) मुंबई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
जगातील कोणतेही सशस्त्र दल वा सुरक्षा दल असो, राष्ट्रीय दिनी संचलन करणे हा एक महत्वाचा अविभाज्य घटक असतो. महाराष्ट्रात देखिल पोलिस दलातील विविध घटकांतील पथके आपल्या शिस्तीचे, एकजुटीचे प्रदर्शन संचलनाच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनी दाखवितात. 26 जानेवारी 2023 प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचलनात भाग घेतलेल्या पथकांमधील उत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना शासनातर्फे चषक देण्यात येतो. त्याकरीता गठित करण्यात आलेल्या निवड समितीने उत्कृष्ट संचलनासाठी तीन पथकांची निवड 19 एप्रिल रोजी केली. यामध्ये गडचिरोली व गोंदिया पोलिस दलाच्या सी-60 पथकाने संयुक्तरित्या गौरवास्पद कामगिरी करीत प्रथम क्रमांकाचे चषक पटकाविले आहे.
गडचिरोली पोलिस दलाचे सी-60 पथक नक्षलविरोधी कारवायांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतातच. त्याचसोबत आपल्या शिस्तीचे आणि एकजुटीचे प्रदर्शन त्यांनी संचलनातून दाखवून दिले आहे. त्याबद्दल गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी संचलनात सहभागी सर्व अधिकारी व जवानांचे कौतुक करीत भविष्यात अशीच कामगिरी करण्याचे आवाहन केले.