भर उन्हाळ्यात आरमोरीकरांपुढे विजेची समस्या : 132 केव्ही वीज केंद्र कार्यान्वीत करा

आंदोलन छेडण्याचा दिला इशारा
GADCHIROLI TODAY
आरमोरी : आधीच उष्णतेमुळे नागरिकांच्या जिवाची लाहीलाही होत असतांना विजेच्या खेळखंडोब्यामुळे आरमोरी शहरवासीयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे 33 केव्ही ऐवजी 132 केव्ही वीज केंद्र कार्यान्वीत करुन शहराला वीज पुरवठा करण्याची मागणी करत वारंवार खंडीत विजेची समस्या पंधरा दिवसात निकाली न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहरातील महिलांनी वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
आरमोरी शहरवासीयांना दरवर्षी उन्हाळयात विजेची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. आता उन्हाळ्याचे दिवस सूरू असल्याने दिवस रात्र विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. विजेच्या कमी दाबामुळे कुलर, पंखे ही काम करीत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील चामोर्शी, गडचिरोली, वडसा, कुरखेडा आदी ठिकाणी 132 केव्हीवरुन विज पुरवठा होतो. मग आरमोरी शहरात गेल्या वीस वर्षांपासून 132 केव्हीचे विज केंद्र कार्यान्वीत का करण्यात आले नाही ? असा प्रश्न उपस्थित करीत शहरातील आक्रोशित महिलांनी माजी जिप सभापती वेणू ढवगाये व माजी ग्रापं सदस्या मेघा मने यांच्या नेतृत्वात वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता बोबडे यांची भेट घेत चर्चा केली. तसेच पंधरा दिवसात समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा दिला. यावेळी चर्चेदरम्यान उपकार्यकारी अभियंता बोबडे यांनी कृषी पंपामुळे विजेवरील भार वाढल्याने खंडीत वीज पुरवठ्याची समस्या निर्माण झाली असल्याचे सांगितले. सदर समस्या तात्काळ निकली काढून सुरळीत वीज पुरवठा करू, असे आश्वासन त्यांनी महिलांच्या शिष्टमंडळाळाला दिले.
यावेळी शिष्टमंडळात माजी जिप सभापती वेणू ढवगाये, माजी ग्रापं सदस्या मेघा मने, सारिका मारभते, सूनंदा रामटेके, शारदा चंडीकार, ज्ञानेश्वर ढवगाये, मेघा दीपक मने, सुषमा गेडाम, गीता भोयर निर्मला दुमाणे, रमाबाई खोब्रागडे, शिल्पा खोब्रागडे, वर्षा मेश्राम, इंदिरा खोब्रागडे आदी महिला उपस्थित होत्या.