राजकीय वर्तुळात खळबळ उडविणारी घटना ; अतुल गण्यारपवार यांना ठाणेदाराकडून बेदम मारहाण

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : चामोर्शी कृउबाचे माजी सभापती तथा जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अतुल गण्यारपवार यांना चामोर्शीच्या ठाणेदाराने बेदम मारहाण केल्याची घटना 20 एप्रिल रोजी घडली असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकरणाने या निवडणूकीला गालबोट लागले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाची तक्रार पोलिस अधीक्षक यांचेकडे करण्यात आली असून अतुल गण्यारपवार यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.
जिल्ह्यात गडचिरोली, चामोर्शी, अहेरी, आरमोरी, सिरोंचा या पाच कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. 20 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. यादरम्यान पहाटे 5 वाजताच्या सुमारास चामोर्शी पोलिस स्टेशनचे ठाणेदार राजेश खांडवे यांनी कृउबासचे माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना फोन करुन ठाण्यात बोलावले. त्यांना ठाण्यात जाण्यास उशीर झाल्याने ठाणेदाराने तीनवेळा फोन करुन तु न आल्यास तुझ्या घरात घुसून तुला ओढत नेईन, अशी धमकी दिली. त्यामुळे गण्यारपवार पोलिस स्टेशनला पोहचले. गण्यारपवार पोलिस ठाण्यात पोहचताच ठाणेदार खांडवे यांनी शिवीगाळ करीत गण्यारपवार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी ठाण्यातील पोलिस कर्मचा-यांनी ठाणेदारांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही हाकलून लावले. ठाणेदाराच्या तावडीतून कसेबसे सुटत गण्यारपवार जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले असून त्यांच्या डाव्या हाताला, पाठीवर, खांद्याला, मानेला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी चामोर्शी ठाण्यातील पोलिस कर्मचा-यांनी ठाणेदाराविरोधात तक्रार घेण्यास नकार दिला. त्यामुळे अतुल गण्यारपवार यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार करुन ठाणेदार खांडवे यांचेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
एसपींनी घेतली प्रकरणाची दखल
राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणा-या या प्रकरणाची दखल स्वत: पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी घेतली आहे. या प्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून अतिरीक्त पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांचेकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तक्रारदार अतुल गण्यारपवार यांचे बयाण नोंदविण्यात आले असून या प्रकरणी चामोर्शी पोलिस ठाण्याचे सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात आले आहेत. या प्रकरणाचा चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली.
ठाणेदार म्हणतात मारहाण केली नाही
चामोर्शीचे ठाणेदार राजेश खांडवे यांनी अतुल गण्यारपवार यांना कसलीही मारहाण केली नसल्याची पोस्ट चामोर्शी येथील काही समाजमाध्यमावर टाकली. यात त्यांनी असे म्हटले आहे की, गण्यारपवार रात्री बाजार समिती निवडणूकीचे पैसे वाटत होते. त्यांनी पोलिसांना शिवीगाळ केली, निलंबित करण्याची धमकी दिली व आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गुंडागर्दी व हातापायी केली. या अगोदरही त्यांचा भाऊ अमोल गण्यारपवार यांनीही सेवा सहकारी निवडणूकीत आमच्या पोलिसांना शिवीगाळ केली, त्याचीही नोंद घ्या. अतुल गण्यारपवार यांचा यापूर्वी अपघात झाला होता. त्यात ते फॅक्चर झाले होते, त्याचे बिल ते माझ्यावर फाडत आहेत, असाही यात उल्लेख आहे.

प्रकरणाची सखोल चौकशी करा

गण्यारपवार यांनी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बाजू मांडली. प्रतिष्ठीत व्यक्ती, राजकारणी तसेच विविध पदे भूषविणा-या अतुल गण्यारपवार यांनी गुन्हा काय याबाबत विचारणा केली असता कोणतेही उत्तर न देता बेदम मारहाण करण्यात आली. ठाणेदारांच्या या प्रकारामुळे प्रतिष्ठा मलीन झाली आहे. कायद्याचा रक्षकच हुकूमशाही वृत्तीने वागत असून यातून निवडणूक प्रभावित करण्याचा प्रकार सुरु आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी अमोल गण्यारपवार यांनी यावेळी केली. यासंदर्भात पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर केले असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला माजी जिप सदस्य राजु आत्राम, माजी पंस सदस्य माधव परसोडे, बाजार समितीचे माजी संचालक सुधाकर निखाडे, वामन गौरकार, रमेश भसारकर, नामेदव वर्धेवार, वासुदेव दिवसे, रमजान शेख आदी उपस्थित होते.