जिल्हाभरात सरासरी 4.4 मिमी पावसाची नोंद ; पुढील चार दिवस ‘येलो अलर्ट’

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : गडचिरोली शहरासह परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळवा-याने हजेरी लावित पावसाची बरसात झाली. यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर अनेक भागातील वीज पुरवठा रात्रभर खंडित राहिल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. जिल्हाभरात सरासरी 4.4 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तसेच हवामान विभागाने पुढील चार दिवस येलो अलर्ट जारी केला असून अवकाळीचा धोका कायम आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये धाकधुकी वाढली आहे.
जिल्ह्यातील वातावरण कमालीचे तापदायी असतांना हवामान विभागाने विदर्भासह जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार गुरुवारी दिवसभर आभाळ स्वच्छ असतांना रात्रोच्या सुमारास वातावरणात एकाएक बदल होऊन वादळी वा-याला सुरुवात झाली. विजेच्या कडकडाटासह मुसळधार वादळामुळे शहरवासीयांची एकच तारांबळ उडाली होती. वादळादरम्यान रिमझिम पाऊस बरसल्याने वातावरणा कमालीचा गारवा निर्माण झाला. मात्र रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाल्याने वृद्ध तसेच चिमुकल्यांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला.
जिल्हाभरात गुरुवारी सरासरी 4.4 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यात 9.3 मिमी, कुरखेडा 12.5 मिमी, आरमोरी 5.5 मिमी, चामोर्शी 0.8 मिमी, सिरोंचा 2.7, अहेरी 2.0, एटापल्ली 1.9 मिमी, धानोरा 2.5 मिमी, कोरची 11.6, देसाईगंज 0, मुलचेरा 4.2 मिमी तर भामरागड तालुक्यात 4.5 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. आता पुन्हा २५ एप्रिलपर्यंत हवामान विभागाने विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मलमपोडूर, लाहेरी ला वादळी वा-यासह गारपीटाचा तडाखा
गडचिरोली शहर परिसरासह जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातही मलमपोडूर, लाहेरी परिसरालाही वादळी वा-यासह गारपीटाचा चांगलाच तडाखा बसला. वादळासह झालेल्या गारपीटामुळे मलमपोडूर येथील कृष्णा बिश्वास, सुरेंद्र वड्डे, राजू कोरके, लाहेरी येथील अर्चना वड्डे या नागरिकांच्या घरांचे कवेलू व सिमेंट पत्रे उडाले. पावसाची पाणी घरात घुसल्याने संसारोपयोगी साहित्यांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानग्रस्तांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे.