8 ते 10 रानटी हत्तींच्या कळपाकडून नुकसानीचे सत्र सुरूच

जामटोला परिसरातील नागरिक भयभीत
GADCHIROLI TODAY
कुरखेडा : तालुक्यातील जामटोला परिसरात बुधवारी रात्रीच्या सुमारास प्रवेश केलेल्या रानटी हत्तीच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसांपासून मुक्कामी असलेल्या या कळपाने शेतशिवारातील धानपिकासह झोपड्यांचे अतोनात नुकसान केले आहे. या हत्तींकडून नुकसानीचे सत्र शुक्रवारीही सुरूच आहे. यामुळे शेतकरी धास्तावले असून परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.
छत्तीसगड राज्यातून धानोरा तालुक्यातील मुरूमगाव पूर्व वनपरिक्षेत्रात प्रवेश करीत 8 ते 10 च्यासंख्येत असलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने नासधूस करणे सुरु केले आहे. या हत्तींनी 15 एप्रिल रोजी धानोरा तालुक्यातील खोब्रामेंढा येथील उन्हाळी धान पिकांची तसेच शेतातील झोपड्यांची नासधूस केली होती. दरम्यान, रानटी हत्तींनी बुधवारी कुरखेडा तालुक्यात प्रवेश करीत जामटोला येथील आनंदराव मडावी यांच्या शेतशिवारातील झोपडीची व उन्हाळी धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. दुसऱ्याही दिवशी जामटोला परिसरातच या कळपाचा अधिवास असून नुकसानीचे सत्र सुरूच आहे. या कळपाने गावातील तुकाराम नैताम, कलीराम होळी यांच्या शेतपिकासह कैलास मडावी यांची झोपडी व पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. हत्तींचे आगमन झाल्याने हाती आलेल्या उन्हाळी धान पिकाची हत्तींकडून नासधूस सुरु असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.