दुचाकीच्या अपघातात माय-लेक गंभीर

धानोरा-गोडलवाही मार्गावरील घटना
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : दुचाकीचे ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार माय-लेक गंभीर जखमी झाल्याची घटना आज 21 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास धानोरा-गोडलवाही मार्गावर घडली. शांताराम नोहरू आतला (२५), राणूबाई नोहरू आतला (50) दोन्ही रा. सरांडा (गट्टा) असे जखमी माय-लेकाचे नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, शांताराम आतला आपल्या आईसह गावाहून दुचाकीने गोडलवाही मार्गे धानोरा येथील बँकेत येत होता. दरम्यान, घाटावरील काली माता मंदिरा जवळील वळणावर दुचाकीचे ब्रेक फेल झाल्याने दुचाकी रस्त्याच्या खाली उतरली. या अपघातात माय-लेकाला डोक्याला व इतर ठिकाणी मार लागून गंभीर दुखापत झाली आहे. सदर अपघात झाल्याची माहिती मिळताच वन समितीच्या लोकांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती धानोरा ग्रामीण रुग्णालयाला कळवली. दोघांनाही रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालयात भरती करून प्रथमोपचार करण्यात आले. जखमींची परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचाराकरिता गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.