‘या’ गावात दारू विक्री केल्यास भरावा लागणार दीड लाखाचा दंड

– ग्रापं व तंमुसचा निर्णय
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथे अनेक वर्षांपासून टिकून असलेल्या दारूबंदीला गालबोट लावीत अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे आधीच शासकीय योजना, दाखले बंद करण्यात आले आहेत. आता पुन्हा ग्रापं व तंमुसने संयुक्तरित्या कठोर निर्णय घेतला आहे. गावात दारू विक्री करणाऱ्याला तब्बल १ लाख ५० हजारांचा दंड भरून द्यावा लागणार आहे. या निर्णयाने दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
आमगाव येथे अनेक वर्षांपासून अवैध दारूविक्री बंद होती. मात्र, काही दिवसांपूर्वी गावाच्या वेशीवर लपून दारूविक्री सुरु असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. तेव्हा ग्रामपंचायत व तंटामुक्त समितीने सदर विक्रेत्यांना ग्रामपंचायतमध्ये बोलावून त्यांचे शासकीय योजना, दाखले, कागदपत्रे बंद केले होते. मात्र, मागील आठ दिवसांपासून पुन्हा मुजोर विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय मांडला. गावाची दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी तंमुस अध्यक्ष भाग्यवान पारधी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत पदाधिकारी व तंमुस सदस्यांची बैठक २१ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली. या बैठकीसाठी ग्रामस्थांसह दारूविक्रीचा अवैध व्यवसाय करणाऱ्या तीन जणांना सुद्धा बोलावण्यात आले.
यावेळी दारूविक्रेत्यांनीही दारूचा अवैध व्यवसाय करीत असल्याची कबुली दिली असता, आमच्या गावात दारूची विक्री करायची नाही. आजपासून गावात दारूविक्री करतांना आढळून आल्यास दीड लाखाचा दंड भरून देण्याची तयारी ठेवा, असेही दारूविक्रेत्यांना ठणकावून सांगण्यात आले. यावेळी दारूविक्रेत्यानी समितीचा निर्णय मान्य करीत अवैध व्यवसाय बंद करण्याची ग्वाही दिली. सभेला सरपंच रुपलता बोदेले, उपसरपंच प्रभाकर चौधरी, तंमुसचे माजी अध्यक्ष नंदू डाकरे, पोलिस पाटील उज्वला बोदेले, ग्रामस्थ आनंदराव वाढई, कालिदास चंडीकार, विलास देशमुख, मुक्तिपथ तालुका संघटिका भारती उपाध्याय यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.