सलग दुसऱ्याही दिवशी जनजीवन विस्कळीत ; पुन्हा तीन दिवस अवकाळीचा धोका कायम

-शेतकरी हवालदिल
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : हवामान विभागाने जिल्ह्यात काही दिवस विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार सलग दोन दिवस अवकाळीने जिल्ह्याला झोडपून काढले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात आणखी तीन दिवस म्हणजेच 25 एप्रिलपर्यंत अवकाळीचा धोका कायम आहे. यामुळे मका, आंबा या पिकांचे प्रचंड नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

आंबा पिकाचे नुकसान

हवामान विभागाच्या अंदाजानुसार शुक्रवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह शहर परिसरातील गावांना पावसाने झोडपून काढले होते. शनिवारी सकाळी परत स्वच्छ वातावरणासह कडक ऊन्हाची चाहूल लागली. मात्र सायंकाळच्या सुमारास सलग दुसऱ्या दिवशी शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. या वादळी पावसाचा जिल्ह्यातील भामरागड, धानोरा, गडचिरोली, मुलचेरा या तालुक्यातील अनेक गावांना फटका बसला आहे. भामरागड तालुक्याला वादळी पावसामुळे सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक गावातील नागरिकांच्या घराचे छत उडुन गेले. तर अनेकांच्या घरांवर झाडे कोसळल्याने संसार उघड्यावर पडले.
आरमोरी तालुक्यातील वडधा परिसराला काल रात्रीच्या सुमारास वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. या वादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडल्याने वाहतूकही प्रभावित झाली होती. वादळी पावसाचा आंबा पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. तसेच मका, निसव्यावर आलेले ऊन्हाळी धान पीक, मिरची, कारली, भाजीपालावर्गीय पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाने तत्काळ नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
मागील दोन दिवसांपासून वादळी अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. या वादळात अनेक झाडे उन्मळून वीज तारांवर पडल्याने गडचिरोली शहर परिसरासह अनेक तालुक्यात रात्रीच्या सुमारास बत्ती गुल होण्याचे प्रमाण वाढले आहे. आधीच गरमीने नागरीक हैराण झाले असतांना रात्रीच्या सुमारास वीज खंडित राहत असल्याने समस्येत अधिकच भर पडत आहे. महावितरणच्या कर्मचा-यांद्वारे वीज सुरळित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी वादळी वा-यापुढे तेही हतबल होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
जिल्ह्यात सरासरी 2.6 मिमी पावसाची नोंद
जिल्ह्यात सरासरी 2.6 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. गडचिरोली 3.1 मिमी, एटापल्ली 3.0 मिमी, धानोरा 3.2 मिमी तर मुलचेरा तालुक्यात 5.3 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कुरखेडा, आरमोरी, चामोर्शी, सिरोंचा, अहेरी, कोरची व देसाईगंज तालुक्यात पावसाची नोंद करण्यात आली नसली तरी वादळी वा-यामुळे या तालुक्यातील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत पडले होते.