वादळी पावसाचा फटका ; अवकाळीचे संकट 27 एप्रिलपर्यंत कायम

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : हवामान विभागाने दिलेल्या इशा-यानुसार जिल्ह्यात गुरुवारपासून सुरु झालेला अवकाळीचा तडाखा संपण्याचे नाव घेत नसून सलग तिस-या दिवशीही काही भागाला वादळी पावसाचा फटका बसला. काही ठिकाणी कवेलू, टिनपत्रे उडाले तर काही भागात घरांची पडझड झाली. वादळासह गारपीट व पावसामुळे मका, धान व आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल दिसून येत आहे. आता पुन्हा अवकाळीचे संकट 27 एप्रिलपर्यंत कायम असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हवामान विभागाने जिल्ह्यात 20 एप्रिलपासून पाच दिवस येलो अलर्ट दिला होता. त्यानुसार गुरुवारपासून वादळी पावसाचा तडाखा सुरु झाला. शुक्रवार, शनिवारलाही जिल्ह्याच्या काही भागात वादळी पावसाने झोडपून काढले. अवकाळीचा सर्वाधिक फटका कोरची, आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चामोर्शी तालुक्याला बसला आहे. आज रविवारलाही सायंकाळच्या सुमारास ढग दाटून येत वादळी पावसास सुरुवात झाली होती. आरमोरी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात शनिवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळवारा व तुरळक पावसामुळे दुकानांचे बोर्ड उडाले. तर शेतक-यांच्या मका, भाजीपाला, टरबूज व धानपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. वादळामुळे कै-या गळून पडल्या आहेत. कोरची तालुक्यातही शनिवारला गारांसह मुसळधार पाऊस कोसळला. वादळामुळे अनेकांच्या घरांचे कवेलू, टिनपत्रे उडाले. वाको गावातील सौरऊर्जा दिव्यांचे खांब विद्युत तारांवर जावून पडले. अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या.
हवामान विभागाने गडचिरोली जिल्ह्यात अगोदर 20 ते 24 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून वादळी वा-यासह अवकाळी पाऊस कोसळत आहे. यामुळे शेतक-यांच्या पिकासह अनेक नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. त्यातच पुन्हा हवामान विभागाने 27 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. काही भागात उन्हाळी धानपीक कापणीवर आले आहेत. मात्र आता पुन्हा अवकाळीचा मुक्काम वाढल्याने उन्हाळी धान उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.
चामोर्शी तालुक्यात घरांची पडझड, तर भिंत पडून म्हैस ठार
चामोर्शी (वा.) तालुक्यात दोन दिवसापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतपिकासह घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येनापुरात घराची भिंत कोसळल्याने म्हैस ठार झाल्याची घटना घडली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळत आहे. या वादळी वारा व पावसामुळे मका, धान, फळपिकांचे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर 21 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास येनापुर येथील केशव बोडावार यांच्या घराची भिंत कोसळून घरासमोर बांधून असलेली बापन्ना जक्कुलवार यांची म्हैस जागीच ठार झाली. तालुक्यातीलच बेलगटा चक, शांतीनगर, पेटतळा या गावातील काही घराची पडझड झाली आहे. त्यात घराचे अंशतः नुकसान झाले. नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी म्हैस मालक बापन्ना जक्कुलवार यांनी केली आहे.
अहेरीत चक्रीवादळामुळे घरांचे नुकसान
आज सायंकाळच्या सुमारास आलेल्या चक्रीवादळामुळे अहेरी येथील प्रभाग क्रमांक 14 मधील संतोष नामनवार यांच्या घराचे छप्पर उडून 40 ते 50 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. तसेच अहेरी येथील अनेक लोकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. महसूल अधिका-यांनी नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी संतोष नामनवार यांनी केली आहे.
कोटगूल सर्कलमध्ये 92.6 मिमी पाऊस
जिल्ह्यात मागील 24 तासात 8.9 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक 47.4 मिमी पाऊस कोरची तालुक्यात तर कोटगूल सर्कलमध्ये 92.6 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. धानोरा तालुक्यात 15.9 मिमी, एटापल्ली 9.1 मिमी, चामोर्शी 8.9 मिमी, कुरखेडा 7.8 मिमी, देसाईगंज व मुलचेरा 5.2 मिमी, गडचिरोली व आरमोरी तालुक्यात 3.9 मिमी पावसाची नोंद करण्यात आली.