हृदय हेलावून टाकणारी घटना ; वज्राघाताने दोन चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

दुधडेयरी-तुळशी फाट्या लगतची घटना
GADCHIROLI TODAY
कुरखेडा : तालुक्यातील मालेवाडा- गुडगुडा येथील नातेवाईकाचा लग्न आटोपून परत येत असताना अचानक अंगावर वीज कोसळून एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्यांसह चौघे जागीच ठार झाल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना  देसाईगंज शहरापासुन एक किलोमीटर अंतरावर असलेल्या दुधडेयरी -तुळशी फाट्या लगत आज सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास घडली. भारत राजगडे (३५), पत्नी अंकिता भारत राजगडे (२९) तर चार वर्षीय मुलगी देवांशी व दोन वर्षीय बाली असे मृतकांचे नाव असून ते देसाईगंज तालुक्यातील आमगाव (बुट्टी) येथील रहिवासी होते.
प्राप्त माहितीनुसार, देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील रहिवासी असलेले पती-पत्नी आपल्या दोन चिमुकल्या अपत्यासह कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा-गडगडा येथे आयोजीत नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते. लग्न कार्यक्रम आटपून स्वगावी परतीच्या मार्गांवर असताना अचानक वीजांच्या गडगटासह पाऊस सुरु झाल्याने देसाईगंज-कुरखेडा मार्गावर असलेल्या दुधडेयरी-तुळशी फाट्या लगत आपली दुचाकी उभी करून कुटुंबा समवेत झाडाच्या आसऱ्याने उभे असता सायंकाळच्या सुमारास अचानक वीजेचा गडगडाट होऊन वीज त्यांच्या अंगावर कोसळली. या घटनेत चौघेही जागीच ठार झाले.
भारत राजगडे हा झाडिपट्टी रंगभूमीत कार्यरत कलावंत असुन सद्या स्थितीत तो लग्न संभारंभ, वाढदिवस व इतरही कार्यक्रमाचे औचित्य साधून आयोजीत मौफिलीचे कार्यक्रम घेऊन कुटुंबाचा गाडा चालवित होता.आई-वडिलांना एकच मुलगा असुन काही वर्षापुर्वीच वडिलाचे निधन झाल्याने म्हाताऱ्या आईसह कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत होता. दरम्यान लग्न संभारंभ आटपून परतिच्या मार्गांवर असताना अचानक कुटुंबावरच वीज कोसळून संपुर्ण कुटुंबच जागीच ठार झाल्याने म्हाताऱ्या आईचा आधारच हरवल्याने परिवारातील सदस्य पुरते हादरले आहेत. घटनेबाबत देसाईगंज पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कुटुंबातील चौघांनाही शवविच्छेदना करीता येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनेचा मर्ग देसाईगंज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.