गडचिरोली जिल्ह्यात अवकाळीचा मुक्काम वाढला ; पुढील चार दिवस ‘येलो अलर्ट

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. आता पुन्हा पुढील चार दिवस पावसाचा जिल्ह्यात मुक्काम कायम राहणार असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना व वादळी पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविली आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासूनच जिल्ह्यात गारांसह अवकाळी पाऊस पडत आहे. सोमवारी विजांच्या कडकडाटांसह वादळी वाऱ्याच्या सोबतीने पावसाने हजेरी लावली. रब्बी हंगामातील विविध पिकांची नासधूस केल्यानंतरही पावसाने मन भरले नसून आणखी काही दिवस पाऊस पडणार आहे. पुढील चार दिवस जिल्ह्यातील काही ठिकाणी अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हवामान विभागाने जिल्ह्यात २९ एप्रिलपर्यंत येलो अलर्टचा इशारा दिला आहे. सोमवारी जिल्ह्याच्या काही भागात वादळी पावसाने झोडपून काढले. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ढग दाटून येत वादळी पावसास सुरुवात झाली होती. अवकाळीचे संकट कायम असून आतापर्यंत विविध तालुक्यातील घरांची पडझड, शेतपिकांचे नुकसान व वज्राघाताने जीव गेल्याची घटनाही घडली आहे. शेतक-यांच्या मका, भाजीपाला, टरबूज व धानपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. वादळामुळे कै-या गळून पडल्या आहेत. वादळामुळे अनेकांच्या घरांचे कवेलू, टिनपत्रे उडाले. अनेक ठिकाणी विद्युत समस्या निर्माण झाली आहे.
एटापल्लीला अवकाळीचा तडाखा
जिल्ह्यात मागील २४ तासात 1.4 मीमी पावसाची नोंद झाली असून एटापल्ली परिसरात सर्वाधिक 27.2 मीमी पाऊस बरसला. कोरची तालुक्यात 10.6 मीमी, एटापल्ली 6.8 मीमी पावसाने हजेरी लावली. उर्वरित तालुक्यांमध्ये पावसाची नोंद झाली नसली तरी ढगाळी वातावरणासह वादळी वारे सुटले होते. देसाईगंज तालुक्यातील विसोरा गावानजीक वीज पडून चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापनाने केली आहे.