PM KISAN लाभार्थ्यांसाठी खुशखबर ; ‘या’ योजनेतूनही मिळणार लाभ

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : पी.एम.किसान योजनेतील पात्र लाभार्थी हे महाराष्ट्र शासनाने सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषणा केलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ या योजनेसाठी देखील पात्र राहतील. सदर शेतकऱ्यांना अतिरीक्त 6 हजार रुपये वार्षिक देय राहील. PM KISAN योजनेअंतर्गत सर्व पात्र शेतक-यांनी एप्रिल ते जुलै 2023 कालावधीतील 14 व्या हप्त्यासाठी भूमिअभिलेख नोंदी पोर्टलवर अद्ययावत करावे, बँक खाती आधार क्रमांकास जोडावी तसेच ई-केवायसी प्रमाणिकरण करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
भूमि अभिलेख नोंदी अद्यावत करणे प्रलंबित असलेल्या लाभार्थी शेतक-यांनी संबंधित तहसीलदार तथा पीएम किसान तालुका नोडल अधिकारी यांच्याकडून त्यांच्या नोंदी अद्ययावत करून घ्याव्यात. बँक खाती आधार क्रमांकास जोडणे व प्रमाणिकरण करणे या दोन्ही बाबींची पुर्तता लाभार्थीने स्वत: करायची आहे. लाभार्थीने स्वत:च्या सोईनुसार ई- केवायसी पडताळणीसाठी पीएम किसान पोर्टलवरील https://pmkisan.gov.in/ या लिंक आधारे किंवा सामाईक सुविधा केंद्र मार्फत या दोनपैकी एका सुविधेच्या आधारे त्यांची ई- केवायसी पडताळणी करावी. तसेच बँकेत समक्ष जाऊन आपले बँक खाते आधार क्रमांकास जोडून घ्यावे. या तिन्ही बाबींची पूर्तता केलेल्या पात्र लाभार्थीनाच पुढील हप्त्याचा लाभ अदा करणार असल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे.
पीएम किसान योजनेतील पात्र लाभार्थी हे महाराष्ट्र शासनाने सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या “नमो शेतकरी महासन्मान निधी” या योजनेसाठी देखील पात्र राहतील. त्यांना पीएम किसान योजनेप्रमाणे अतिरीक्त 6 हजार रुपये वार्षिक देय राहतील. पीएम किसान योजनेच्या 14 व्या व त्यापुढील हप्त्यांचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी 30 एप्रिलपूर्वी भूमिअभिलेख नोंदी पोर्टलवर अद्ययावत करावे, बँक खाती आधार क्रमांकास जोडावी तसेच ई-केवायसी प्रमाणिकरण करण्याची पूर्तता करावी, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.