पोलिस भरतीत बनावट प्रमाणपत्र प्रकरण ; पोलिसांच्या गळाला लागला मुख्य सुत्रधार

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : गडचिरोली चालक पोलीस शिपाई व पोलीस शिपाई भरती २०२१ या भरती प्रक्रियेत बोगस कागदपत्रांचा आधार घेऊन पोलिस विभागात दाखल झालेल्या आणि तात्पुरत्या यादीत निवड झालेल्या सहाव्या आरोपीला सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. देविदास ऊर्फ बाळू मेश्राम असे आरोपीचे नाव असून तो बनावट प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या रॅकेटचा मुख्य सुत्रधार असल्याचे बोलल्या जात आहे.
गडचिरोली पोलीस चालक शिपाई व पोलीस शिपाई भरती प्रक्रियेची 12 एप्रिल रोजी तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात विविध आरक्षणानुसार पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली. एका निनावी तक्रारदाराच्या तक्रारीवरुन प्रकल्पग्रस्त या समांतर आरक्षणातील निवड झालेल्या उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांच्या पडताळणी केली असता प्रकल्पग्रस्तांच्या आरक्षणातील उमेदवारांनी जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त असल्याचे खोटे दाखले जोडल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पाच युवकांना अटक करण्यात आली होती. अधिक चौकशी केली असता बनावट प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या रॅकेटचा स्थानिक सुत्रधार देविदास ऊर्फ बाळू मेश्राम याच्या सोमवारी मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
फरार आरोपीचा शोध सुरु
या प्रकरणी शनिवारी राकेश देवकुमार वाढई, वैभव दिलीप झाडे, आकाश रामभाऊ राऊत, मंगेश सुखदेव लोणारकर, आणि मिन्नाथ पुरुषोत्तम थोरात या पाच आरोपीना अटक करण्यात आली. प्रकरणातील आणखी एक आरोपी धनराज रेचनकर फरार असून पोलिसांचे एक पथक त्याला शोधण्यासाठी रवाना झाले आहेत. बनावट प्रमाणपत्र प्रकरणातील मुख्य सुत्रधार देविदास मेश्राम यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.