अनियंत्रित ट्रॅक्टर उलटून भीषण अपघात ; दोन महिला जागीच ठार तर 27 गंभीर

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : शासकीय योजनांची जत्रा या कार्यक्रमात सहभागी होऊन ट्रॅक्टरने गावाकडे परत येत असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने अनियंत्रित ट्रॅक्टर उलटून झालेल्या भीषण अपघातात 2 महिला जागीच ठार तर 27 जण गंभीर जखमी झाल्याची घटना 26 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास आसरअल्ली पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या रंगधामपेठा गावाजवळ घडली. मल्लका जक्कुल मोडेम (52) व गोसुला गंगु लसमय्या (70) दोघेही रा. लक्ष्मीदेवपेठा ता. सिरोंचा अशी मृतक महिलांची नावे आहेत.
सिरोंचा तालुक्यातील चिटूर या गावात तालुका प्रशासनाद्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध गावातील बहूसंख्य नागरीकांसह लक्ष्मीदेवपेठा गावातील नागरिकही सहभागी झाले होते. कार्यक्रम आटोपताच गावातील तब्बल 29 नागरीक ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसून गावाकडे परत येत होते. दरम्यान रंगधामपेठा गावाजवळ ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्यावरच उलटून भीषण अपघात घडला. यात दोन महिला जागीच ठार झाल्या तर 27 जण गंभीर स्वरुपात जखमी झाले. अपघात घडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. जखमींना तत्काळ उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले.
या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्याने 27 जण जखमी झाले. जखमींना तत्काळ सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले. यातील 12 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तत्काळ तेलंगणा राज्यातील मंचेरियल येथे उपचारार्थ हलविण्यात आल्याची माहिती आहे. जखमींमध्ये गोसुला शांता (58), शानगोंडा मलय्या (70), मोडेम चिन्नका (65), चिन्ना मलय्या लचमेरा लंबाडी (74), आंदे दवक्का लसमया (70), समक्का किष्टया गुरनुले (70), लक्ष्मी चंद्रया लंबाडी (45), समया मोंडी कारकरी (50), जमाडी येलक्का (65), मोरला चिन्नका मदनया (63), चिकला समय्या दुर्गया (60), कोण्णी अंकमा संतोष (30), अंबाडी सामया राममेरा (68), पेद्दी बुचक्का मलया (65), अंबाडी चिनक्का मलया (68), चिंतला पोसक्का बापु (69), गुरनुले मुत्यालु बानया (70), इंगक्का मुत्यालु गरुनुले (60),लंगारी लक्ष्मी लसमया (55), लच्युबाई बापु दुर्गे (70), रामक्का मदनया जयाडी(52), चिंतकुंटला पोसक्का बुचम (60) और रामन्ना नारायण जयाडी (74) सर्व रा. लक्ष्मीदेवपेठा यांचा समावेश आहे.
भीषण अपघात झाल्याची माहिती प्राप्त होताच सिरोंचा तालुका प्रशासनाच्या अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतले. तहसिलदार जितेंद्र शिकतोडे यांचेसमवेत प्रशासकीय अधिका-यांनी घटनास्थळ गाठित जखमींना तत्काळ रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या प्रक्रियेदरम्यान सायंकाळ उशिरापर्यंत तहसिलदार यांनी घटनास्थळावरील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. सदर घटनेची तक्रार आसरअल्ली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली असून ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.