गडचिरोलीच्या कलेक्टर आंब्याची विक्री होणार आंतरराष्ट्रीय स्तरावर

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा व अहेरी या भागात कलेक्टर आंबा प्रजातीची 800 ते 1000 झाडे असून यातून स्थानिक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असते. या आंब्याचे जीआय मानांकन घेऊन आंब्याची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवावी, अशा सूचना कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी कृषी अधिका-यांना दिल्या. जी आय मानांकनासाठी कृषी विभागाकडून प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावर याची विक्री करणे सोपे जाणार आहे.
नागपूर येथे झालेल्या बैठकीत खरीप हंगाम पूर्व बैठकीत राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी संजय मीणा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी तसेच इतर जिल्ह्यांचे अधिकारी उपस्थित होते.
येत्या खरीप हंगामासाठी आवश्यक बी बियाणे, रासायनिक खते शेतकऱ्यांच्या बांधावर वेळेत पोहचवा असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रशासनाला दिले. या बैठकीत जिल्हाधिकारी संजय मीणा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी गडचिरोली जिल्ह्याची माहिती सादर केली. यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात आढळणारा कलेक्टर आंबा यावेळी जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना भेट म्हणून दिला. जिल्ह्यात राबविण्यात येत असणाऱ्या कृषीविषयक योजना तसेच नाविन्यपूर्ण स्ट्रॉबेरी, काजू व ड्रॅगन फ्रुट याबाबत प्रधान सचिव तसेच कृषी मंत्री सत्तार यांनी गडचिरोली जिल्ह्याचे कौतुक केले.
खरीपात 2 लाख 25 हजार 890 हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ट
जिल्ह्यात एकूण सिंचनाखालील क्षेत्र 67 हजार हेक्टर आहे. सरासरी पेरणी क्षेत्र खरीप मधील 1 लाख 90 हजार 256 हेक्टर आहे. रब्बी पिके 22927 हेक्टरवर होते. उन्हाळी पीक 9811 हेक्टर घेतले जाते. गेल्या वर्षी 2022-23 मध्ये जिल्ह्यात विविध खरीप पिकांची 2 लाख 10 हजार 183 हेक्टरवर पेरणी झाली होती. यावेळी यामध्ये वाढ करून 2 लाख 25 हजार 890 हेक्टर वर पेरणी करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाकडून ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मास्तोळी यांनी खरीप हंगाम व तयारीची माहिती सादर दिली.
37 हजार 485 क्विंटल बियाणांची गरज
खरीप हंगामासाठी विचारात घेण्यात आलेली पिके यामध्ये भात, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन व कापूस आदी पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील पेरणी क्षेत्रासाठी आवश्यक असणारी बियाणांची गरज ही 37 हजार 485 क्विंटलची आहे. या बियाणांचा स्रोत हा महाबीज व खाजगी पुरवठादारांकडून होणार आहे. खरीप हंगामपूर्व याची उपलब्धता करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.
पावसाळ्यापूर्वी खत व बियाणांचा पुरवठा करणार
यावर्षी खतांचा पुरवठा प्रक्रियेमध्ये जिल्ह्याची मागणी 75 हजार 255 मेट्रिक टन आहे. 31 मार्च पर्यंतची शिल्लक 12533 मेट्रिक टन होती. जिल्ह्यातील खताचे आवंटन 54 हजार 670 मेट्रीक टन आहे. खत पुरवठा 2596 मेट्रिक टन झाला असून खत विक्री ही 764 मेट्रीक टन झाली आहे. शिल्लक साठा हा 832 मेट्रिक टन आहे. जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे कट ऑफ होणाऱ्या गावांमध्ये प्रशासनाकडून पावसाळ्यापुर्वी खत व बियाणांचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती दिली.