जिप सीईओनी उगारला कारवाईचा बडगा ; तीन ग्रामसेवक निलंबित

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड, अहेरी, मुलचेरा या तीन तालुक्यात मग्रारोहयोअंतर्गत झालेल्या कामात कोट्यवधीचा भ्रष्टाचार उघडकीस आला होता. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच चौकशी समितीद्वारे प्राप्त अहवालाअंती जिप सीईओ कुमार आशीर्वाद यांनी दोषी आढळून आलेल्या तीन ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा उगारित निलंबित केले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत भामरागड, अहेरी, मुलचेरा तालुक्यातील करोडो रूपयांची बोगस कामे तसेच काम न करता पैशाची उचल करणा-या अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांच्या नेतृत्वात तक्रार करण्यात आली होती. त्या अनुषंगाने या कार्यालयाने 22 डिसेंबर 2022 चे आदेशान्वये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) रवींद्र करणे यांचे अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने 24 फेब्रुवारी 2023 रोजी चौकशी अहवाल सादर केला होता. जिप सीईओ कुमार आशीर्वाद यांनी चौकशी अहवालात प्रथम दर्शनी दोषी आढळून आलेल्या भामरागड पंस अंतर्गत येत असलेल्या मन्नेराजाराम ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विशाल एस. चिडे, बोटनफुंडी ग्रापं ग्रामसेवक सुनील व्ही. जट्टीवार तसेच अहेरी पंस अंतर्गत येत असलेल्या उमानूर ग्रापंचे ग्रामसेवक लोमेश यादवराव सिडाम यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
भामरागड पंस प्रकरणी प्राप्त चौकशी अहवालामध्ये गटविकास अधिकारी, शाखा अभियंता, सहाय्यक लेखा अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत) व 6 ग्रामसेवक प्रथम दर्शनी दोषी आढळून आले आहेत. याअंतर्गत त्यांचेवर विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. तसेच गटविकास अधिकारी यांचेविरुद्ध शिस्तंभग कार्यवाहीकरीता विभागीय चौकशी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. तर तांत्रिक सहाय्यक (टीपीओ) यांना काढून टाकण्याबाबतची कार्यवाही सुरु असल्याची माहिती जिप प्रशासनाने दिली आहे.
मुलचेरा, अहेरी पंस तक्रारीची चौकशी सुरु
यापुढे पंचायत समिती मुलचेरा व अहेरी येथील तक्रारी संबंधाने तांत्रीक बाबीच्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता (बांधकाम) यांचेकडून पूरक चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीच्या अंतिम अहवालाअंती यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे.
कुमार आशीर्वाद, सीईओ, जिप गडचिरोली