‘त्या’ अपघातातील मृतकांची संख्या पोहोचली तीन वर

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : रंगधामपेठा गावाजवळ अचानक ट्रॅक्टर ट्रॉली पलटून झालेल्या भीषण अपघातात 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. तर अपघातात सुमारे 27 जण जखमी झाले होते. दरम्यान, 12 गंभीर जखमींना तेलंगणातील मंचेरियल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमींपैकी एकाचा आज सकाळी मृत्यू झाल्याने अपघातातील मृतकांची संख्या तीनवर पोहोचली आहे. चिन्ना मलय्या लचुमेरा लंबाडी (74) रा.लक्ष्मीदेवीपेठा असे मृताचे नाव आहे.
सिरोंचा तालुक्यातील चिटूर गावात तहसील प्रशासनाच्या वतीने बुधवारी महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लक्ष्मीदेवीपेठा येथील नागरिक गेले होते. कार्यक्रम आटोपून सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास गावकरी ट्रॅक्टरवर बसून आपल्या गावाकडे परत जात होते. दरम्यान, रंगधामपेठा गावाजवळ ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर 27 जण जखमी झाले. यापैकी चिन्ना मलय्या लचुमेरा लंबाडी यांच्यासह एकूण 12 जण गंभीर जखमी होते. त्यांना तेलंगाणा राज्यातील मंचेरियाल येथे उपचारासाठी भरती करण्यात आले होते. मात्र आज सकाळच्या सुमारास लंबाडी यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर उर्वरित जखमींवर मंचेरियाल आणि सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.