वारंवार पाठपुरावा करूनही दिव्यांग योजनांच्या प्रतीक्षेतच

दिव्यांगांच्या समस्यांवर चर्चा

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण झाल्या नाही तर सर्वांगीण व्यक्तिमत्वावर परिणाम होऊन सर्वसामान्यांचेही जीवन जगणे अवघड होते. मात्र, अनेक दिव्यांग व्यक्ती शिलाईकाम, चटई विणकाम असे अनेक लहान-मोठे कामधंदे करून कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. सध्यास्थितीत अनेक दिव्यांग बांधव शासनाच्या कल्याणकारी योजनांपासून वंचित असूनही शासनाकडून दुर्लक्ष केला जात असल्याचा सूर वडधा येथे पार पडलेल्या विकास अपंग जन परिसर संघाच्या बैठकीत उमटला.
वडधा येथील शेषराव बरडे स्वतः दिव्यांग असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शिलाईकाम, चटई विणकाम करतो आणि स्वाभिमानाने जीवन जगतो. यामुळे पोटापाण्याचा प्रश्न सुटतो. पण निवाऱ्याचा प्रश्न कायम आहे. पूर्वी 28 हजाराचा घरकुल मिळाला होता. तो आता भग्न अवस्थेत आहे. घर राहण्याजोगे नसल्याने घरकुल मिळावा म्हणून शासनस्तरावर अनेक वेळा संघटनेच्या सदस्यांसोबत जाऊन घरकुलाबाबत मागणी करून आपली परिस्थिती कथन केली. परंतु, पूर्वी मिळालेल्या घरकुलाच्या अटीवर त्यांना घरकुल मिळत नाही म्हणून ग्रामपंचायत आणि पंचायत समिती मधून सांगितल्या जाते. हे सगळे ऐकून निराश होऊन परत माघारी येतो. दिव्यांग व्यक्तीच्या उत्थानासाठी, पुनर्वसनासाठी शासन अतिशय संवेदशीलपणे योजना राबवितो. त्यांचे सामाजिक, आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी कार्य करतो, पण एख्याद्या व्यक्तीला जीवन जगण्यापासून परावृत्त करण्याचा हा एक प्रकार दिसून येत असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.
व्यवस्थित निवारा नसेल तर जीवन जगणे खूप कठीण होतोय. त्यामुळे योजना देताना प्रथम गरजू, गरीब, अलक्षित, दुर्लक्षित, वंचित दिव्यांग व्यक्तीना योजनेचा लाभ प्रथम प्रधाण्याने देण्यात यावे, गावामध्ये शहानिशा करण्यात यावे हे कार्यनीती अवलंबिली तर कोणीही शासकीय योजनेपासून वंचित राहणर नाही. घरकुल व प्रवासातील अडचणीमुळे दिव्यांग व्यक्तीवर परिमाण होत आहे. दिव्यांग व्यक्तीच्या योजनेपासून दिव्यांग व्यक्तीला फायदा होत नसेल तर दिव्यांग व्यक्तीच्या हक्काची पायमल्ली होत आहे, आदी मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी निशा जांभूळकर, नरेश कांबळे, अमीर तुराळे, संगिता तुमडे यांच्यासह वडधा परिसरातील दिव्यांग बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
गडचिरोली-वडधा- आरमोरी बससेवा सुरु करा
शासनाने 1997 पासून दिव्यांग व्यक्तींना प्रवासासाठी ¼ सवलत असल्याने प्रवास करणे सोपे होते. कमी तिकीट असल्यामुळे दिव्यांग व्यक्ती सहज प्रवास करून आपले वैयक्तिक कामे करू शकतात. पण गडचिरोली-वडधा- आरमोरी बस सेवा सन 2020 – 21 पासून बंद असल्यामुळे वडधा परिसरातील दिव्यांग बांधवाना प्रवास करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे गडचिरोली-वडधा- आरमोरी बससेवा पूर्ववत सुरु करण्याची मागणीही बैठकीतून करण्यात आली.