बळीराजाला सावधानतेचा इशारा ; अवकाळीसह गारपीठीचे संकट

-उत्पादित मालाचे संरक्षण करावे

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार गडचिरोली जिल्ह्यात अवकाळीसह गारपीठ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी परिपक्व झालेल्या पिकांची काढणी व मळणी करून होणारे नुकसान टाळावे. तसेच विजांपासून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी पशुधनाचे व स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. संदीप कऱ्हाळे यांनी केले.
जिल्हास्तरीय हवामान अंदाजानुसार जिल्ह्यात अंशतः ढगाळ वातावरण राहून २९ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व काही ठिकाणी गारपीठ, मुसळधार पावसाचा इशारा वर्तविण्यात आला आहे. ३० एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना व वादळी वारा, १ मे ला तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना व वादळी वारा, काही ठिकाणी गारपीठ होण्याची शक्यता वर्तवली आहे. २ ते ३ मे पर्यंत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना व वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाचे संरक्षण करावे. तसेच जिल्ह्यात पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना व अवकाळी पावसाचा इशारा लक्षात घेता, पशुपालकांनी आपले पशुधन झाडाखाली न बांधता सुरक्षित ठिकाणी बांधावे. चरावयास न सोडता गोठ्यातच चाऱ्याची सोय करावी, असे आवाहन जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राने केले आहे.