खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी बळकाविल्याची शक्यता ; चौकशी करा- छगन शेडमाके

GADCHIROLI TODAY

आरमोरी : जिल्हा पोलीस भरतीत खोट्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रांचा वापर करुन नोकरी मिळविण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याच पद्धतीने जिल्ह्यातील अनेक नोकर भरतीत नोकरी बळकाविण्याचा प्रकार घडल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मागील 10 वर्षांपासून प्रकल्पग्रस्त या समांतर आरक्षणातून गडचिरोली जिल्ह्यात नोकरी प्राप्त करणाऱ्या सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रकल्पग्रस्त असल्याच्या प्रमाणपत्रांची चौकशी करावी, अशी मागणी आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात शेडमाके यांनी म्हटले आहे की, गडचिरोली पोलीस विभागामध्ये नुकत्याच झालेल्या भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्तांचे बनावट प्रमाणपत्र तयार करून नोकरी पटकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले. वास्तविक गडचिरोली जिल्ह्यात प्रकल्पग्रस्तांचे प्रमाण अत्यंत कमी आहे आणि शासकीय कार्यालयांमध्ये जवळजवळ सर्वच विभागात प्रकल्पग्रस्तांच्या समांतर आरक्षणांमधून उमेदवारांची निवड केली जाते. या निवड प्रक्रियेत त्यांची अंतिम निवड यादी जाहीर झाल्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुद्धा केली जाते. अशा पडताळणीत पोलीस विभागाच्या भरतीत सात युवकांव्यतिरिक्त असे बनावट प्रमाणपत्र देणारे एक मोठे रॅकेट राज्यभर सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. यावरून हे रॅकेट प्रमाणपत्र मिळवून देण्यापासून ते पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा लाभार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन सहकार्य करत असते, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात मागील दहा वर्षापासून सर्व शासकीय आणि निमशासकीय विभागांमध्ये जे प्रकल्पग्रस्त या समांतर आरक्षणामध्ये कर्मचारी नियुक्त झाले आहेत, त्यांचे प्रमाणपत्र कितपत खरे आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच यापुढे होणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये सुद्धा प्रकल्पग्रस्त या समांतर आरक्षणामध्ये भरती होणाऱ्या किंवा ज्यांची निवड अंतिम टप्प्यात आहे अशा सर्वांच्या प्रकल्पग्रस्त असल्याच्या प्रमाणपत्राची विशेष विभागामार्फत पडताळणी करण्यात येऊन बनावट प्रमाणपत्र लावून नोकरी करणाऱ्यांना वाव मिळू नये अशी व्यवस्था करावी, अशी मागणी शेडमाके यांनी केली.