ठरावाचे उल्लंघन करणे दारूविक्रेत्यांना पडले महागात ; ‘या’ग्रामपंचायतने आकारला हजारांचा दंड

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा ग्रामसभेच्या ठरावाचे उल्लंघन करणे दोन दारूविक्रेत्यांना महागात पडले आहे. ग्रामपंचायत समिती, तंमुस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या कारवाई करीत १५ हजारांचा दंड वसूल केला आहे. सोबतच अवैध व्यवसाय बंद करण्याची ताकीद देण्यात आली.
अवैध दारूविक्री मुक्त गाव निर्माण करण्यासाठी किन्हाळा ग्रामपंचायतने दारूबंदीचा निर्णय घेतला होता. सोबतच ग्रामसभेमध्ये नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा ठराव पारित करण्यात आला होता. मात्र, गावातील दोन विक्रेत्यांनी चोरट्या मार्गाने अवैध व्यवसाय सुरु केल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे ग्रामपंचायत समिती, तंमुस समिती व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या कारवाई करून दोन दारूविक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी दारूविक्रेत्यांकडून १५ हजार रुपयांचा दंड वसूल करून ग्रामपंचायतच्या सामान्य फंडामध्ये कायदेशीररित्या जमा करण्यात आला. यानंतर दारूविक्री करतांना आढळून आलेल्या दंडाच्या डबल रक्कम वसूल करण्याचेही ठणकावून सांगण्यात आले.
यावेळी पोलिस पाटील संजय पत्रे, तंमुस अध्यक्ष दिवाकर बारसागडे, उपसरपंच सुरेश दोनाडकर, तंमुस सदस्य कैलास पारधी, सदस्य प्रभुदास बुल्ले, सुभाष दोनाडकर, मुक्तिपथ तालुका संघटक भारती उपाध्ये उपस्थित होते.