भीषण अपघात : अनियंत्रित ट्रकची ग्रापंच्या संरक्षण भिंतीला धडक, एका पादचाऱ्यासह दोन ठार

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात अनियंत्रित ट्रकने ग्रामपंचायतच्या संरक्षण भिंतीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका पादचाऱ्यासह दोन जण ठार तर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील मुरखळा (नवेगाव) ग्रामपंचायतजवळ रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. मुकरू गोमसकार (५५) रा.मुरखळा असे मृत पादचाऱ्याचे नाव असून एकाची ओळख पटलेली नाही. ट्रकचालक पिंटू मजोके हा गंभीर जखमी आहे.
लोह खनिजाची वाहतूक करणारा ट्रकचालक पिंटू मजोके किसाननगर येथे घरी जाण्यासाठी निघाला होता. वाटेत व्याहाड येथे जाण्यासाठी उभ्या असलेल्या एका प्रवाशाला गाडीत बसवले. दरम्यान दुपारी १२ वाजताच्या सुमारास गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील मुरखळा ग्रामपंचायतजवळ ट्रकसमोर दुचाकीस्वार आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात भीषण अपघात झाला. यावेळी ट्रकने ग्रामपंचायत समोरील स्मारकाला धडक दिली. यात मुरखळा येथील रहिवासी मुकरू गोमसकार व ट्रकमध्ये बसलेल्या अनोळखी प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालक पिंटू मजोके हा गंभीर जखमी झाला आहे. अनोळखी प्रवाशाचा मृतदेह गाडीत अडकला होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.