जलयुक्त शिवार अभियान 2.0 , जिल्ह्यातील 184 गावांचे उद्दिष्ट

ग्राम समितीच्या मान्यतेने गाव आराखडा

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : जलयुक्त शिवार अभियान 2.0 राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्याकरिता 184 गावांचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ, शेतकरी व सर्व संबंधित विभागाच्या समन्वयाने शिवारफेरी व नियोजनबद्धरित्या कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामुळे हा कार्यक्रम एक लोक चळवळ होणार आहे.
विविध मृद व जलसंधारणाचे क्षत्रिय उपचार व ओघळ नियंत्रण उपचार, जुन्या स्त्रोतांचे बळकटीकरण, आवश्यकतेनुसार दुरुस्ती, गाळ काढणे इत्यादी कामे गावात मोहीम स्वरूपात राबविण्यासाठी शिवार फेरीचे नियोजन आवश्यक आहे व त्यानुसार प्राथमिक आराखडे तयार करावयाचे आहेत. ग्राम समितीच्या मान्यतेने गाव आराखडा करण्यात येईल. यामुळे सरपंच हे ग्राम समितीचे पदसिद्ध अध्यक्ष राहतील. ग्राम समितीमध्ये ग्रामपंचायत सदस्य, प्रगतशील शेतकरी, पुरस्कार प्राप्त शेतकरी, महिला प्रतिनिधी, ग्रामसेवक व गावाशी संबंधित शासकीय क्षत्रिय कर्मचारी यांचा समावेश राहील. जलसंधारण अधिकारी व कृषी पर्यवेक्षक हे समन्वयक म्हणून काम पाहतील.
एटापल्लीतील सर्वाधिक 50 गावे
गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यातील गावांची संख्या 184 एवढी आहे. यामध्ये सर्वाधिक एटापल्ली तालुक्यातील 50 गावे, गडचिरोली – 8, धानोरा – 15, चामोर्शी 11, मुलचेरा – 9, वडसा -10, आरमोरी -10, कुरखेडा -9, कोरची -10, अहेरी-18, एटापल्ली – 50, भामरागड -11 व सिरोंचा तालुक्यातील 23 गावांचा समावेश आहे. यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट असलेल्या अहेरी, ऐटापल्ली व सिरोंचा तालुक्यातील कामांचा समावेश आहे.
ग्रामस्थांनी सहकार्य करावे
शिवार फेरीला जास्तीत जास्त गावातील नागरिकांनी व सर्व विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी हजर राहून गाव आराखडा तयार करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभागामार्फत करण्यात आले आहे.