बोगस प्रमाणपत्र प्रकरण ; वेगवेगळ्या जिल्ह्यातून आणखी आठ आरोपींना अटक

गडचिरोली पोलिसांची कारवाई

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : सध्या संपुर्ण महाराष्ट्र राज्यात गाजत असलेल्या बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र घोटाळयाच्या गुन्ह्यामध्ये गडचिरोली पोलिसांनी आणखी 8 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात आरोपींची संख्या 14 झाली आहे. या प्रकरणात आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बोगस प्रमाणपत्र प्रकरणी गुन्हा दाखल होताच 5 आरोपींना अटक करण्यात आली होती. पाचही आरोपींनी खोटे प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र मिळविण्याकरीता आरोपी देविदास ऊर्फ बाळू देवराव मेश्राम याच्या मार्फतिने मोठी रक्कम दिली असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. पोलिस पथकाने वनविभागात कार्यरत देविदास देवराव मेश्राम याला अमरावती येथून अटक केली होती. न्यायालयाने त्याला 8 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आरोपीने दिलेल्या माहितीवरून रायगड पोलिस दलात कार्यरत सिद्धेश पाटील याला खोटे प्रमाणपत्र मिळविण्याकरीता मोठी रक्कम पाठविली असल्याचे तपासात दिसून आले. सपोनि नितीन ऊईके यांच्या नेतृत्वातील पोलिस पथक रायगड येथे रवाना करून स्थानिक पोलिसांच्या मदतीने सिद्धेश पाटील यास ताब्यात घेण्यात आले. त्याची विचारपूस केली असता पोलिस प्रशिक्षण केंद्र तुरची जि. सांगली येथे फॉरमासिस्ट या पदावर कार्यरत असणारा हौसाजी देशमुख यास पैसे पाठवून खोटे प्रमाणपत्र मिळविले असल्याची माहिती दिली. त्या माहितीवरून पोउपनि राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वातील पोलिस पथक सांगलीकडे रवाना करण्यात आले. परंतु आरोपी हौसाजी देशमुख हा म्हसवड जि. सातारा येथे असल्याची माहिती मिळताच तेथील पोलिसांची मदत घेवून त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याची विचारपूस केली असता, त्याने खोटे प्रमाणपत्र तयार करण्याकरीता बीड येथील सत्तार शेख व पांडुरंग धलपे हे पैसे घेवून मदत करीत असल्याचे सांगीतले. गुन्हा दाखल होताच बीड येथे पोउपनि दीपक कुंभारे व सचिन सानप यांच्या नेतृत्वातील पोलिस पथक तळ ठोकून असल्याने त्यांना हौसाजी देशमुख यांनी दिलेली माहिती देण्यात आली. त्यावरून त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सत्तार शेख व पांडुरंग धलपे यांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पांडुरंग धलपे हे पेशाने वकिल असून सत्तार शेख हे शासकिय कार्यालयांमध्ये नोकरीवर नसताना देखिल विविध कार्यालयांच्या संपर्कात राहून माहिती मिळवित होता. सर्व आरोपी संगणमत करून लोकांकडून मोठ्या रकमा स्विकारून खोटे प्रमाणपत्र तयार करून देत होते.
आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी
आरोपींना पोलिस पथकाने वेगवेगळ्या जिल्ह्यातून सापळा रचून ताब्यात घेवून त्यांना कायदेशिर अटक केली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीना 5 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणात आतापोवतो एकूण 14 आरोपींना अटक करण्यात आली असून ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक कुमार चिता यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी, पोउपनि पुरुषोत्तम वाडगुरे, पोहवा नरेश सहारे, हेमंत गेडाम, पोना सतीश कत्तीवार, राकेश सोनटक्के, दीपक लेनगुरे, अकबर पोयाम, शुक्रचारी गवई, पोअ माणिक दुधबळे, सुनील पुट्ठावार, मंगेश राऊत, सचिन घुबडे, श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, सुरेश वट्टी, प्रशांत गरफडे, मसफी लीला सिडाम यांनी पार पाडली.