लोक अदालतीतून 1 कोटी 80 लाख 34 हजारांची वसुली

-697 दाखलपुर्व खटले आपसी तडजोडीने निकाली
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यातील न्यायालयात 30 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून 335 प्रलंबित आणि 697 दाखलपुर्व खटले आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले असून 1 कोटी 80 लाख 34 हजार 392 रुपयांची वसुली करण्यात आली.
तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, 138 एन.आय. ॲक्ट प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बॅकेशी संबंधीत प्रकरणे तसेच वाद दाखलपुर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन, मोबाईल कंपनी संबंधीत वाद, महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे,
पतसंस्थेशी संबंधीत प्रकरणे, नगर परिषद अंतर्गत कर आकारणीचे प्रकरणे तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथील प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले. किरकोळ स्वरुपाच्या मामल्यांकरीता स्पशेल ड्राइव्हद्वारे फौ.प्र.सं. चे कलम 256 व 258 तसेच गुन्हा कबुलीचे एकुण 186 प्रकरणे निकाली काढण्यात आली.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष यु.बी. शुक्ल व सचिव आर. आर. पाटील यांच्या देखरेखीखाली लोकन्यायालयाचे
आयोजन करण्यात आले होते. दिवाणी न्यायाधिश एम.आर. वाशिमकर यांनी पॅनल क्र.01 वर काम पाहिले, पॅनल क्र.02 वर मुख्य न्यायदंडाधिकारी एम.व्ही. तोकले यांनी काम पाहिले. किरकोळ गुन्हयाचे खटले फौ.प्र.सं. कलम 256, 258 अन्वये तसेच गुन्हा कबुलीद्वारे निकाली काढण्याकरीता तृतिय सहदिवाणी न्यायाधिश तथा न्यायदंडाधिकारी एन.सी. सोरते यांचे न्यायालय कार्यरत होते. तसेच पॅनल क्रमांक 01 मध्ये पॅनल सदस्य म्हणून डी.एन. बावणे, पॅनल क्रमांक 2 मध्ये पॅनल सदस्य म्हणून सौ.बी. एम.उसेंडी यांनी काम केले. लोकन्यायालय यशस्वी करण्याकरीता गडचिरोली जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष रविंद्र दोनाडकर तसेच जिल्हा वकील संघाचे जेष्ठ अधिवक्ता, इतर वकील व न्यायालयीन कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
पती-पत्नीचा समझोता
वैवाहिक वादाच्या एका प्रकरणात पती-पत्नी यांचा समझोता होवून पत्नी नांदायला गेल्याने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यु.बी. शुक्ल यांनी साडी, चोळी व शेला देवून सत्कार केला.