ह्रदयद्रावक घटना ! एकाच शाळेत कार्यरत दोन शिक्षक भावंडाचा मृत्यू

ह्रदयद्रावक घटना ! एकाच शाळेत कार्यरत दोन शिक्षक भावंडाचा मृत्यू
Heartbreaking ! Death of two siblings working in the same school
GADCHIROLI TODAY
कुरखेडा : एकाच शाळेत कार्यरत दोन शिक्षक भावंडांचा 12 दिवसांच्या अंतराने मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना तालुक्यातील गोठणगाव येथे उघडकीस आली आहे. मोठ्या भावाचा तेरवीचा विधी सुरु असतांनाच धाकट्याच्या मृत्यूची बातमी आल्याने कुटूंबियांवर दु:खाचे डोंगर कोसळले. संजय टेमसूजी बगमारे (55) व नंदकिशोर टेमसूजी बगमारे (53) अशी मृत शिक्षक भावंडाची नावे आहेत.
तालुक्यातील पळसगाव येथील मुळ निवासी असलेले बगमारे बंधू यांनी शिक्षण घेत शिक्षक पदावर रुजू झाले. पुढे ते नोकरीनिमित्य कुरखेडा शहरातच स्थायीक झाले. दरम्यान दोघही गोठणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते. यादरम्यान 23 एप्रिल रोजी संजय बगमारे यांचा मृतदेह शहरालगतच्या एका शेतातील पाण्यातर तरंगताना आढळला. आत्महत्या की हत्या याचे गुढ कायम असतांनाच 4 मे रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने नंदकिशोर बगमारे यांचा मृत्यू झाला. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना कुटुंबियांनी कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अवघ्या 12 दिवसाच्या कालावधीत संजय बगमारे व नंदकिशोर बगमारे या दोन्ही भावंडाचा मृत्यू झाल्याने बगमारे कुटूंबियांवर दुहेरी आघात झाला आहे. संपूर्ण बगमारे कुटूंबीय शोकसागरात बुडाले असून या घटनेने कुरखेडा शहरात हळहळ व्यक्त होत आहे. दोन्ही शिक्षक भावंडे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून सुपरिचत होते. त्यांच्या जाण्याने विद्यार्थ्यांनाही शोक अनावर झाला होता.