क्रीडा शिक्षकांच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ ; गडचिरोलीतील युवकांमध्ये प्रतिभेचे भंडार : अडसूळ

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : निसर्गतःच प्रचंड क्षमता असलेले प्रतिभावान खेळाडू गडचिरोली जिल्ह्यात असून त्यांना योग्य मार्गदर्शन व योग्य संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. जिल्ह्यातील युवकांमध्ये क्रीडा विषयक प्रतिभांचे भंडार असल्याचे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी केले.
क्रीडा शिक्षकांच्या जिल्हास्तरीय आठ दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटनाप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल होते. तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, सामाजिक कार्यकर्ते प्रणय खैरे यांचेसह आठ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी नुकतेच बालेवाडी पुणे क्रीडा संकुल येथून प्रशिक्षण घेऊन आलेले दहा प्रशिक्षकांसह जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
पुढे बोलतांना अडसूळ म्हणाले, क्रीडा प्रशिक्षक म्हणून प्रत्येक गावात गावस्तरीय क्रीडा शाळाही सुरू करणे गरजेचे आहे. गावागावात असलेल्या मैदानात स्थानिक युवकांना मोफत मार्गदर्शनाबरोबरच आधुनिक क्रीडा क्षेत्र याबद्दलची माहिती दिली तर निश्चितच ते भविष्यात देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचे स्वप्न पाहतील. गावागावातील शाळांमधून क्रीडा विषयक मार्गदर्शन मुलांना त्या-त्या वयातच दिले तर त्यांची शरीरयष्टी त्या खेळासाठी निश्चित वेळेत तयार होईल. यातूनच त्या खेळाविषयी त्यांच्यात आवड निर्माण होऊन ते जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आपला चांगला ठसा उमटवतील. बदलत्या क्रीडा क्षेत्रातील धोरणानुसार आता वेगवेगळ्या स्तरावर सामन्यांचे आयोजन करून त्यातून आर्थिक फायदाही खेळाडूंना होत आहे. ‘खेलोगे कुदोगे तो लाजवाब बनोगे’ या म्हणी प्रमाणेच क्रीडा क्षेत्रातील तरुणांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदललेला आहे. क्रीडा क्षेत्राला व्यावसायिकतेची जोडही आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रतिभांचे भंडार असलेल्या युवकांना क्रीडा क्षेत्रात पुढे नेण्याचे कार्य सर्व शिक्षकांनी मिळून करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांनी उपस्थित शिक्षकांना प्रशिक्षित शिक्षकांकडून मार्गदर्शन आत्मसात करण्याचे आवाहन केले. सांघिक तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारात प्राविण्य प्राप्त खेळाडूंना पुढे घेऊन जाण्यासाठी क्रीडा विभाग प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
प्रशिक्षित शिक्षकांमध्ये यांचा समावेश
गडचिरोली जिल्ह्यातून पुणे येथे प्रशिक्षित झालेले मास्टर ट्रेनर सुरेश निंबाते, खुशाल मस्के, भूपेंद्र चौधरी, मनीष बानवले, अनिल बारसागडे, अतुल येलमुले, संदीप हिचामी, मिलिंद साळवे, संतोष गईनवार, मृणाली सराफ, पुरुषोत्तम बोरीकर व प्रमोद भांडारकर यांचा समावेश आहे.