दारूविक्री तर सोडाच ‘या’ गावात खर्रा पन्नी फेकल्यासही भरावा लागतो दंड ; ९ वर्षांच्या यशाचा वाजत-गाजत जल्लोष

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील पुसेर गावातील नागरिकांनी तब्बल ९ वर्षांपासून आपल्या गावाला दारू व तंबाखूमुक्त ठेवले आहे. एवढेच नव्हे तर गावात खर्रा पन्नी आणून टाकल्यास त्याच्याकडूनही दंड वसूल करण्यात येतो. या गावाने नुकतेच विजयस्तंभ उभारून इतर गावांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
चामोर्शी तालुका मुख्यालयापासून ४० किमी अंतरावर व पावी मुरांडा या ग्रामपंचायत अंतर्गत पुसेर गावाचा समावेश आहे. या गावाने दारूमुळे होणारे भांडण-तंटे व महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी सन २०१४ मध्ये ग्रामसभा घेऊन गावातील दारू, खर्रा, तंबाखू बंदीचा ठराव केला. ठरावाची अंमलबजावणी करीत पानठेले, दारूविक्री पूर्णतः बंद केली. यापुढे कोणी खर्रा, तंबाखू, दारू विक्री केल्यास ५ हजारांचा दंड, गावातील लोकांना बकरा जेवण द्यावे लागेल असे दंडाचे नियम पारित केले. तसेच कोणी खर्राचे पन्नी गावात आणून फेकल्यास त्याच्याकडूनही १०० रुपयांचा दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून हे गाव दारू व तंबाखूमुक्त आहे.
पुसेर गाव यापुढे सुद्धा खर्रा, तंबाखू व दारूमुक्त राहावे,यासाठी नुकतेच गावात विजयस्तंभ उभारणी करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करतांना मुक्तिपथचे तालुका उपसंघटक आनंद सिडाम म्हणाले की, पुसेर गावाला पेसा कायद्या अंतर्गत अनेक साधन संपत्तीची मालकी हक्क मिळाली आहे. शिवाय सामूहिक वनहक्क सुद्धा गावाला मिळाले आहे. गावाने या कायद्याअंतर्गत वेगवेगळे रोजगार गावातच तयार करून गावाचा विकास करता येतो. यासह दारू, तंबाखूचे दुष्परिणाम याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. गाव पाटील केसरी मट्टामी,उपसरपंच विनोद कोंदामी, ग्रापं सदस्य मधुकर कोवासे यांनी गाव दारू व तंबाखूमुक्त राहण्यासाठी ग्रामस्थांना मार्गदर्शन केलेव दारूबंदीमुळे गावाचा किती फायदा होतो हे खुलाशासह स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला ग्रामसभा अध्यक्ष नामदेव मट्टामी, ग्रामसभा सचिव सुधाकर तुमरेटी, सदस्य कोमटी नरोटे, रामू हेळो, शिवाजी हेळो, गाव भूमिया महरो मट्टामी, ललिता मट्टामी, सागरता हेळो, मंगल मट्टामी, अंगणवाडी सेविका कविता कोवासे, ग्रापं सदस्य सविता उसेंडी, अर्चना कुमरे, काशिनाथ उसेंडी, गणू कोवासे, रामदास आतला, स्पार्क कार्यकर्ती सोनी सहारे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन स्पार्क कार्यकर्ती प्रियंका भुरले यांनी केले.