झुडपात दबा धरुन असलेल्या रानडुकराचा शेतकऱ्यावर हल्ला

GADCHIROLI TODAY

अहेरी : झुडपात दबा धरुन असलेल्या रानटी डुकराने हल्ला चढविल्याने शेतकरी जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास आलापल्ली शेतशिवारात घडली. नामदेव येर्रा गावडे (48) रा. आलापल्ली असे जखमीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, नामदेव गावडे हे आपल्या शेत शिवारातील कापूस काढण्यासाठी सकाळच्या सुमारास शेतात गेले होते. दरम्यान काड्या उपसाचे काम करीत असतांना झुडपात दबा धरुन असलेल्या रानटी डुकराने त्यांचेवर हल्ला चढविला. यात त्यांच्या दोन्ही पायांना जखम झाली. त्यांनी आरडाओरड करताच त्यांचा मुलगा घटनास्थळी धावून आल्याने डुकराने पळ काढला. तत्काळ नामदेव गावडे यांना अहेरी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनेची माहिती प्राप्त होताच वनविभागाचे वनपाल संतोष पडालवार, वनरक्षक पी. एस. कुसराम यांनी रुग्णालय गाठित नामदेव गावडे यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी तत्काळ नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. यावेळी वांगेपल्ली ग्रापं सरपंच दिलीप मडावी, महेश नैताम उपस्थित होते.