657 आत्मसमर्पित नक्षल्यांपैकी 150 सदस्यांना भूखंड वाटप

रोजगार मेळावा उत्साहात

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : जिल्हा पोलीस दलासमोर आत्मसमर्पीत होवून मुख्य प्रवाहात आलेल्या नक्षल सदस्यांना सर्व सामान्यासारखे जीवन जगता यावे व समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरीता व त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पीत सदस्यांचा मेळावा उत्साहात पार पडला. यामध्ये आत्मसमर्पण केलेल्या 657 नक्षल सदस्यांपैकी 150 सदस्यांना भूखंडाचे वाटप करण्यात आले. तसेच इतर आत्मसमर्पित नक्षल्यांना विविध कार्डचे वितरण करण्यात आले.
नुकताच जिल्हा पोलिस दलाद्वारे आत्मसमर्पित नक्षल्यांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात बहूसंख्य आत्मसमर्पीत नक्षल सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी त्यांना जातीचे प्रमाणपत्र, अंत्योदय शिधा पत्रिका, ड्रायव्हिंग लायसन्स, ई-श्रम कार्ड, समर्पीत कल्याण कार्ड, कामगार संघटना कार्ड, जॉब कार्ड, आरोग्य कार्ड अशा प्रकारचे विविध कार्डचे वाटप करण्यात आले. आत्मसमर्पण योजना सन 2005 मध्ये सुरु झाली असुन आजपर्यंत एकुण 657 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यांच्या पुनर्वसनाकरीता नवजीवन वसाहतीची स्थापना करुन 174 भुखंडापैकी 150 भुखंड आत्मसमर्पीतांना वाटप करुन नवजीवन वसाहतीमध्ये 33 सदस्यांचे घरकुल बांधकाम पुर्ण झालेले असुन 14 सदस्यांचे घरकुल प्रगती पथावर आहे. तसेच नवजीवन वसाहतमध्ये आत्मसमर्पीतांसाठी सुविधा म्हणुन प्रत्येक घरी नळ, विज, व पथदिवे तसेच समाज मंदिर (गोटुल), माऊली मंदिर चे बांधकाम करण्यात आले. तसेच पाणी पुरवठा योजना, नाली बांधकाम ईत्यादी पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
आत्मसमर्पीतांना रोजगाराची संधी उपलब्ध होणेकरीता 2 बचत गट स्थापन करुन, 10 महिला व 2 पुरुष सदस्यांना ‘फ्लोअर क्लीनर फिनाईल’ तयार करण्याचे एमगिरी वर्धा यांच्या मदतीने प्रशिक्षण दिले. सद्या आत्मसमर्पीत सदस्यांचे 2 बचत गट हे फ्लोअर क्लीनरच्या व्यवसायातुन आत्मनिर्भर झाले आहेत. आत्मसमर्पीत पुरुषांना चारचाकी व दुचाकी वाहन प्रशिक्षण देण्यात आले. त्याचबरोबर एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प गडचिरोली यांचे मदतीने ‘न्युक्लीएस बजट’ योजनेअंतर्गत 86 आत्मसमर्पीत सदस्यांना 50 हजार रुपयेचे अर्थसहाय्य व्यवसाय उभारण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आले. यावेळी कार्यक्रमास पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख उपस्थित होते. यशस्वीतेसाठी आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी सागर झाडे यांचेसह पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.
आत्मसमर्पितांना शक्य ती मदत करु : नीलोत्पल
आत्मसमर्पीत सदस्यांना मार्गदर्शन करतांना पोलीस अधीक्षक सा. यांनी नक्षलवादाचा हिंसक मार्ग सोडुन लोकशाहीच्या मुळ प्रवाहात आल्याबद्दल सर्वप्रथम सर्व उपस्थित आत्मसमर्पितांचे अभिनंदन केले. तसेच एक भारतीय नागरिक म्हणून आवश्यक सर्व प्रकारचे प्रमाणपत्र, विविध योजनांचा लाभ उपलब्ध करुन देण्यास पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने शक्यत ते प्रयत्न करीत असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.