धाडसी चोरी! पोलिसाच्याच घरावर मारला डल्ला ; पोलिसांच्या कृतीमुळे चोरट्यानी मुद्देमाल सोडून ठोकली धूम

GADCHIROLI TODAY

अहेरी : अज्ञात चोरटयांनी पोलिस हवालदाराच्या घरातूनच रोक रक्कमेसह मौल्यवान दागिने लांबविल्याची धाडसी चोरी केल्याची घटना अहेरी शहरातील वार्ड नं. दोनमधील पावर हाऊस कॉलनीती उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शहरातून बाहेर जाणाऱ्या चारही रस्त्यांवर नाकाबंदी करून चोरटयांनी लंपास केलेला ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. मात्र, अज्ञात चोर अंधाराचा फायदा घेऊन जंगलाच्या दिशेने पसार होण्यात यशस्वी झाला.
प्राप्त माहितीनुसार, अहेरी व परिसरात चोरांच्या धुमाकुळाची चर्चा असल्याने पोलीस निरीक्षक किशोर मानभाव यांच्या नेतृत्वात रात्रोला खमनचेरू, महागाव, देवलमारी व आलापल्ली रस्त्यावर पाळत ठेवली. सोबत गावात गस्त वाढवीत असताना वार्ड क्रमांक दोनमध्ये राहणारे पोलीस हवालदार संतोष गडपल्लीवार यांच्या घरी चोरी करून चोर रस्त्यावरून पडून जाताना पोलिसांना दिसला. त्याचा पाठलाग केला असता शस्त्र व चोरीचा माल सोडून अंधाराच्या दिशेने चोर पडून जाण्यात यशस्वी झाला. सदर चोरट्याने पंधरा हजार रुपये नगदी सोडल्यास बाकी चोरी केलेले सोने चांदीचे साहित्य, जुने सोन्याचे मंगळसूत्र असा मुद्देमाल चोराने चोरी केला होता. मात्र, पोलिसांच्या चतुराईमुळे चोरट्याला मुद्देमाल सोडून पळ काढावा लागला.
पोलिसाच्याच घरी चोरी झाल्याने चोरांची हिम्मत वाखानण्याजोगी असल्याचे चर्चेत आहे. त्यामुळे बाहेरगावी गेलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बाहेरगावी जाताना पोलिसांना सूचना, सोने-चांदीचे दागीने लॉकरमध्ये ठेवून अशा घटनांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन अहेरी पोलिसांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध अहेरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक करिष्मा मोरे करीत आहेत.Theft