अवकाळीचा फटका ;  मका वाळविण्यासाठी जागा मिळेना

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : तृणधान्य पिकाच्या उत्पादनामध्ये गहू व धान पिकानंतर मक्याचा क्रमांक लागतो. लागवड खर्च कमी असल्याने जिल्ह्यात मागील सात-आठ वर्षांपासून मका पिकाला धान पिकापेक्षा अधिक पसंती मिळत आहे. मात्र यंदा अवकाळी पावसाने मका पिकाचे अतोनात नुकसान केल्याने उत्पादक शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. काही शेतकऱ्यांनी पिकाची तोडणी केली असून त्यांना मका वाळवण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.
अवकाळीमुळे अनेक ठिकाणी मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मका हे उष्ण हवामानात होणारे पीक असल्याने खरीप, रब्बी व उन्हाळी या तिन्ही हवामानात घेता येते. जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, कोरची, देसाईगंज, चामोर्शी, मुलचेरा आदी तालुक्यातील बहुतांश शेतकरी मका लागवडीकडे वळले आहेत. जे शेतकरी रब्बी हंगामात मिरची व उन्हाळी धानाचे पीक घेत होते, ते शेतकरी आता मका पिकाला पसंती देत आहेत. या पिकाला पाणी कमी लागते. मात्र या वर्षात मार्च महिन्यापासून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अवकाळी पाऊस आल्याने पीक शेवटच्या टप्प्यात असताना शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. तोडणी झालेले पीक पावसामुळे साठवून ठेवावे लागल्याने ते काळवंडले आहे. 31 एप्रिल ते 4 मे पर्यंत जोरदार पाऊस झाल्याने पिकाची तोडणी होऊ शकली नाही. ज्या शेतकऱ्यांनी तोडणी केली, त्यांना जागा मिळेल त्या ठिकाणी मका वाळवावा लागत आहे.