दुर्गम भागातील युवक-युवतींनी गीरविले दुचाकी दुरुस्ती व लेडीज टेलर्सचे धडे

युवकांनो आत्मनिर्भर बना : कुमार चिंता
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : बँक ऑफ इंडिया आरसेटी आणि पोलीस विभागाच्या दादालोरा खिडकी यांच्या मार्फतीने होणारे सर्व प्रशिक्षण हे बेरोजगार युवकांना आत्मनिर्भर बनण्याचा एकमेव मार्ग आहे. स्वतः प्राशिक्षित होऊन आत्मनिर्भर बना, असा सल्ला अतिरिक्त पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांनी दिला.
ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजीत आणि बँक ऑफ इंडिया द्वारा संचालीत ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था ( आरसेटी ) येथे दुचाकी दुरुस्ती आणि लेडीज टेलर्स या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमूख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा अग्रणी प्रबंधक युवराज टेंभूर्णे, आरसेटीचे संचालक कैलाश बोलगमवार, दुचाकी दुरुस्ती प्रशिक्षणाचे तज्ञ मार्गदर्शक किर्तीकुमार धोपटे, लेडीज टेलर्स प्रशिक्षणाच्या मार्गदर्शिका शारदा चांदेकर, कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम, पुरुषोत्तम कुनघाडकर उपस्थित होते.
सदर दोन्ही मोफत निवासी प्रशिक्षण ३० दिवसाचे होते. या दरम्यान प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक चेतन पाटील, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक घनशाम खराबे तसेच देवेंद्र पाटील यांच्या चमूने आरटीओ च्या कार्यालयाविषयी विस्तृत माहिती दिली. सोबतच वारंवार होणाऱ्या अपघातावर कसे नियंत्रण ठेवता येते यावर मार्गदर्शन केले. सोबतच पोलिस विभागाच्या सायबर सेलचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक निलेश कुमार वाघ यांनी नविन डिजीटल युगात गुन्हेगारी कशा प्रकारे फोफावत चालली यावर दृकश्राव्य साधनाद्वारे माहिती देऊन डिजीटल गुन्हेगारी कशा प्रकारे थांबविता येईल, यावर विस्तृत मार्गदर्शन केले .
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल पवार यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली. त्यात मुख्यमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम, प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम यांचा समावेश होता. समारोपीय कार्यक्रमात जिल्हा अग्रणी प्रबंधक युवराज टेंभूर्णे यांनी बँकेची भूमिका स्पष्ट केली. विविध सामाजिक सुरक्षा योजना आणि वित्तीय पुरवठा या विषयावर मार्गदर्शन केले. तत्पूर्वी मुल्यमापन समिती बंगलोरचे प्रतिनिधी पुंडलीक काटकर व चमूने यांनी प्रशिक्षणार्थ्यांचे मौखिक व लेखी परीक्षण केले. समारोपीय कार्यक्रमात अतिरिक्त पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांच्याहस्ते प्रत्येक यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले.