चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या ; आरोपी पतीस जन्मठेप

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला जीवे ठार मारणाऱ्या आरोपी पतीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश उदय बा. शुक्ल यांनी जन्मठेप व 10 हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावली. शामराव रुषीजी शेंडे (38) रा. मुडझा ता. जि. गडचिरोली असे आरोपी पतीचे नाव आहे.
शामराव शेंडे याचे निरंजनासोबत 15 वर्षांपूर्वी लग्न झाले. लग्नानंतर शामरावला दारुचे व्यसन लागले. तेव्हापासून तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून भांडण करायचा. या त्रासाला कंटाळून पत्नी निरंजना मुलांसह आईवडिलांकडे राहावयास गेली. दोन वर्ष आईवडिलांकडे राहिल्यानंतर आरोपी शामरावने निरंजनाला त्रास देणार नाही, असे सांगून आपल्या घरी घेवून गेला. परंतु, काही दिवसातच पुन्हा भांडण सुरु झाले. दरम्यान, 29 सप्टेंबर 2020 रोजी फिर्यादीला त्याच्या जावयाच्या पुतण्याने फोन करून सांगितले की, शामरावने पत्नी निरंजनाच्या डोक्यावर कु-हाडीने वार करून गंभीर जखमी केले आहे. तेव्हा रात्री मुडझा येथे येवून पाहिले असता, निरंजना ही भिंतीलगत रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. तिला सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे नेले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. फिर्यादीने जावयाविरोधात गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. आरोपी शामराविरुद्ध कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. फिर्यादी व इतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा. शुक्ल यांनी आरोपी शामराव शेंडे यास कलम 302 भादंविमध्ये जन्मठेप व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल एस. यु. कुंभारे, एन. एम. भांडेकर यांनी काम पाहिले. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक प्रदीप चौगावकर, सपोनि शरद मेश्राम यांनी केला. कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामकाजात योग्य भूमिका पार पाडली. Judgment of the Chief District and Sessions Court