मेडीगड्डा प्रकल्प सिरोंचातील शेतकऱ्यांसाठी शाप ; नुकसान भरपाईसाठी बाधितांचे माजी पालकमंत्र्यांना साकडे

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : तेलंगणा सरकारने निर्माण केलेला मेडीगड्डा-कालेश्वरम सिंचन प्रकल्प सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शाप ठरला आहे. या प्रकल्पामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, अजूनपर्यंत शासनाकडून नुकसानग्रस्तांना भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे केली आहे.
नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी मेडीगट्टा प्रकल्पग्रस्तांनी सिरोंचा तहसील कार्यालयासमोर गेल्या 14 दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून अनेकवेळा नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र अद्यापपर्यंत पीडितांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही आंदोलकांकडून देण्यात आला आहे. दरम्यान, बाधित शेतकऱ्यांच्या उपोषण मंडपाला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी भेट देवून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी माजी पालकमंत्र्यांचे मागण्यांकडे लक्ष वेधून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी साकडे घातले. यावेळी सकारात्मक प्रतिसाद देत राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी पुरेपूर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.