गडचिरोली नप प्रशासनाकडून अतिक्रमणावर हातोडा

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : शहराला बसलेल्या अतिक्रमणाच्या विळख्यामुळे अपघाताच्या प्रमाणातही सातत्याने वाढ झाली होती. यामुळे शहरवासीयांमध्ये अतिक्रमण धारकांसह प्रशासनाप्रती तीव्र रोष व्यक्त होत होता. यामुळे खळबळून जागे झालेल्या नगर परिषद प्रशासनाने पोलिसांच्या चोख पोलिस बंदोबस्तात 9 मेपासून शहरातील चारही मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरवात केली आहे. यामुळे शहरातील मुख्य मार्गांनी मोकळा श्वास घेतला.
शहरातील इंदिरा गांधी या मुख्य चौकासह धानोरा, चामोर्शी, चंद्रपूर व आरमोरी मार्गावर अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण वाढविल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होणे तसेच अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली होती. यामुळे नप प्रशासनाने मंगळवारी अतिक्रमणधारकांवर कारवाईचा बडगा उगारला. नप प्रशासनाच्या दोन पथकाद्वारे शहरातील चंद्रपूर मार्गावरील एलआयसी चौकपर्यंत तसेच धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालय मार्गापर्यंतचे अतिक्रमण हटविण्यात आले. याप्रमाणेच चामोर्शी मार्गावरील विज्ञान महाविद्यालयापर्यंत अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली. अतिक्रमण धारकांविरोधात नप प्रशासन सक्त झाल्याचे निदर्शनास येताच अनेक दुकानदार, टप-या तसेच व्यावसायिकांनी सकाळपासून स्वत:हूनच आपली दुकाने हटविण्यास सुरवात केली होती.