गडचिरोली शहरात अपघाताची मालिका सुरूच ; ट्रक व स्कॉर्पिओची समोरा-समोर धडक

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या गडचिरोली शहरात अपघाताची मालिका मागील काही दिवसांपासून सुरूच आहे. स्थानिक इंदिरा गांधी चौकात ट्रक व स्कार्पिओची समोरा-समोर धडक झाल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातामुळे वाहतूक काही वेळासाठी प्रभावित झाली होती.
गडचिरोली शहरातील चंद्रपूर मार्गावर काही दिवसांपूर्वी एका ट्रकने युवकास चिरडल्याची घटना घडल्याने मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी सर्वच स्तरावरून केली जात होती. यामुळे नगरप्रशासनाने अतिक्रमणावर बुलडोजर चालवीत इंदिरा गांधी चौकासह शहरातील प्रमुख रस्ते मोकळे केले. अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच असतांना स्थानिक इंदिरा गांधी चौकात पुन्हा अपघात घडला. सीजी ०८ – ९०९७ या क्रमांकाचा ट्रक चामोर्शी मार्गाहुन इंदिरा गांधी चौकात आला होता. अशातच विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच ०४-९५९९ क्रमांकाच्या स्कॉर्पिओची ट्रकला धडक बसली. या अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र, काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.