गडचिरोलीतील स्मृती उद्यान पर्यटकांसाठी खुले ; जाणून घ्या आकर्षणाची केंद्रे व तिकीट दर

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : शहरातील कॉम्प्लेक्स परिसरातील स्मृती उद्यानाचा लोकार्पण सोहळा २ मे रोजी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला होता. सदर उद्यान वनविभागाच्या वतीने सुरू करण्यात आले असून शनिवार १३ मे पासून तिकीट घेतल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे. तसेच लहान मुले व जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवेश असणार आहे. उद्यान पहाटे ५.३० ते सायंकाळी ७ वाजतापर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे.
या उद्यानात विविध प्रकारचे वृक्ष, वेली, झुडपे तथा रोझ गार्डन असून रम्य परिसर तयार केलेला आहे. सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी ८०० मी. लांबीचा जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आलेला असून महिला व पुरुषांसाठी वेगवेगळी ग्रीन जिम तयार करण्यात आलेली आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी स्विंग, सी-सॉ, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वाघांचे स्टॅच्यू इ. प्रमुख आकर्षणाची केंद्रे आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक गेट, बांबू मचान, लोटस गार्डन, पॅगोडा, सेल्फि पॉईंट तयार केलेले आहेत. संपूर्ण कुटुंबासह येथे फिरणे किंवा वनभोजन करण्याचा अनुभव घेणे ही पर्यटकांसाठी वेगळी पर्वणीच आहे.
विरंगुळा केंद्र ठरणार : डॉ. किशोर मानकर
सदर उद्यानाची दुरुस्ती बांधकाम करण्यात आले असून वनविभाग त्याचे नियोजनाचे काम पाहत आहे. स्मृती उद्यान हे गडचिरोली वासियांसाठी एक विरंगुळा केंद्र ठरणार असून, सदर उद्यान आपलेच आहे या भावनेने व भारताचे सुजाण नागरिक या नात्याने त्याची काळजी घ्यावी. उद्यानामध्ये कचरा करू नये, असे आवाहन गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी केले.
तिकीटाचे दर
लहान मुले (वय- ०-५ वर्षे)- मोफत, वय ५ – १२ वर्षे – १०/- रु (५०%), सामान्य नागरिक (वय – १२ ते ६५ वर्षे) – २०/- रु, ६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिक – मोफत, महिना पास (सकाळचे सत्र) – ४००/- रु. अशाप्रकारे तिकीट दर राहतील. उद्यानाला भेट देणाऱ्या नागरिकांनी वयाच्या दाखल्यासाठी आधार/ पॅन/ वाहन चालविण्याचा परवाना किंवा इतर शासकीय ओळखपत्र सोबत ठेवण्याची विनंती वनविभागामार्फत करण्यात आलेली आहे. अशी माहिती वनविभाग गडचिरोलीचे उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा यांनी दिली.