अवैध वेबसाईटचा वापर करून IPL बेटिंग प्रकरणी दोघांना अटक ; विविध साहित्यांसह 7 लाखाचा मुद्देमाल जप्त

GADCHIROLI TODAY

देसाईगंज : आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंग लावून जुगार खेळणाऱ्या दोन आरोपींकडून सट्टा लावण्याकरिता वापरण्यात येणा-या विविध साहित्यांसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई देसाईगंज पोलिसांनी केली. याप्रकरणी कमलेश मुरलीधर कुमरे (28), रा. शिवाजी वार्ड व अक्षय रमेश मेश्राम (27) वर्ष, रा. गांधी वार्ड, देसाईगंज यांना अटक करण्यात आली असून आणखी दोन आरोपी फरार आहेत.
देसाईगंज पोलिसांनी बुधवार, 10 मे रोजी देसाईगंज येथील कुथे पाटील विद्यालयासमोर पाहणी केली असता या ठिकाणी काही ईसम चेन्नई विरुद्ध दिल्ली या आयपीएल मॅचवर सट्टा खेळत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांना बघताच आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले. मात्र यातील एकास ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. संबंधिताची अधिक चौकशी केली असता सदर वेबसाईटची लिंक, युजर आयडी आणि पासवर्ड अक्षय मेश्राम या व्यक्तीने दिली असुन त्या वेबसाईटच्या माध्यमातून मी अवैध सट्टा लावत असल्याचे सांगितले. तसेच अक्षय हा शहरातील अनेक तरुणांना आयपीएलवर सट्टा लावण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड तयार करून देऊन सट्टाबाजी करण्यास उत्तेजित करीत असल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने लाखांदूर टि पॉईंटजवळील रस्त्यालगत वाहनात अवैधरित्या आयपीएलवर सट्टा लावित असतांना अक्षयला अटक करण्यात आली.
सदर कारवाईत एम. एच. 40 एआर 9363 या क्रमांकाचे चारचाकी वाहन अंदाजे किंमत 6 लाख 50 हजार व आयपीएलवर सट्टाबाजी लावण्याकरीता वापरात असलेले जुन्या वापरते अॅपल, सॅमसंग, रेडमी कंपनीचे मोबाईल फोन, विविध बँकेचे एटीएम कार्ड, काही खासगी कागदपत्र, आकडेवारीची चिठ्ठी तसेच काही रोख रक्कम असा एकूण 7 लाख 11 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आयपीएलवर सट्टा लावण्यासाठी अवैध वेबसाईटचा वापर केला जात आहे. यासाठीची वेबसाईटची लिंक, युजर आयडी व पासवर्ड अक्षय मेश्राम या आरोपीने अनेक तरुणांना तयार करुन दिली. याच माध्यमातून आयपीलवरील सट्टा लावण्यासाठी आरोपी तरुणांना उत्तेजित करीत होता, अशी माहिती आहे. या अवैध सट्ट्यात मोठ्या प्रमाणात तरुण गुंतले असून मोठे रॅकेट यात सक्रीय असल्याने या प्रकरणात आणखी काही मासे गळाला लागण्याची चिन्हे आहेत.
देसाईगंज पोलिसांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 व कलम 109 भादंवि अन्वये कमलेश कुमरे व अक्षय मेश्राम यांचेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी दोन आरोपी फरार असून अधिक तपास देसाईगंज ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक युनुस इनामदार करीत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर यांचे मार्गदर्शनात पोस्टे देसाईगंज पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि युनुस इनामदार, निलेश ठाकरे, पोलीस अंमलदार कुमोटी, ढोके व जांभुळकर यांनी केली