आरमोरीतील प्रभाग क्र. 3 मध्ये पाणी टंचाई ; नपवर महिलांची धडक

GADCHIROLI TODAY

आरमोरी :  येथील प्रभाग क्र. 3 बाजारपेठ येथे पाणीटंचाई निर्माण झाली असून महिलांना भर उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नगरपरिषद प्रशासनाने तत्काळ या प्रभागातील वसंत कांबळे यांच्या घराशेजारी बोअरवेल तयार करून द्यावे, या मागणीसाठी येथील महिलांनी राकॉंचे तालुकाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वात नगरपरिषदेवर धडक देत मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना निवेदन सादर केले.
आरमोरी येथील प्रभाग क्र. 3 बाजारपेठ येथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. वसंत कांबळे यांच्या घराजवळ विहीर, बोअरवेल, सार्वजनिक नळ यासारखे पाण्याचे कुठलेही साधन नाही. तसेच या परिसरात अद्यापपर्यंत नगरपरिषदेकडून नळ कनेक्शन मिळाले नसल्याने भर उन्हाळ्यात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही गंभीर बाब असून प्रभागातील महिलांना होणारा त्रास दूर करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने बाजारपेठ येथील वसंत कांबळे यांच्या घराजवळ तत्काळ बोअरवेल खोदून महिलांचा पाण्याचा प्रश्न मिटवावा. पाण्याचा प्रश्न न मिटल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरपरिषदेसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला.निवेदन देताना राकॉंचे तालुकाध्यक्ष संदीप ठाकूर, मुख्याधिकारी संजय मीना, नगराध्यक्ष पवन नारनवरे, राकॉंच्या महिला तालुकाध्यक्ष ज्योती घुटके, राकॉंचे शहर अध्यक्ष सचिन लांजेवार, महिला लिला लांजेवार, भूमिता लांजेवार, शुभांगी भोयर, यशोधा गायकवाड, विद्या गायकवाड, सुमित्रा कांबळे, पुष्पा हिरापुरे, निर्मला कांबळे, सुनीता दुमाने, गौरा सहारे, अनुसया कांबळे, वनिता दुमाने, विद्या मेश्राम, सीता दुमाने, भारती दुमाने, दुर्गा मंगरे उपस्थित होत्या.