एका दिवसात उभारले पोलिस मदत केंद्र ; पिपली बुर्गीत पोलिस दल तैनात

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी परिसर अतिसंवेदनशिल म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या परिसरातील नक्षल कारवायांना आळा बसवा, यासाठी गडचिरोली पोलिस दलाद्वारो एका दिवसात पिपली बुर्गी येथे पोलिस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. सदर पोमकेचे आज उद्घाटन करण्यात आले.
सदर पोलिस मदत केंद्राची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात एकुण 1 हजार मनुष्यबळ, 10 जेसीबी, 10 ट्रेलर, 3 पोकलेन, 40 ट्रक आदींच्या सहायाने अवघ्या एका दिवसांत पोमकेची उभारणी करण्यात आली. सदर नवीन पोमकेच्या उद्घाटन कार्यक्रमास गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरिक्षक संदीप पाटील, सीआरपीएफचे पोलिस उपमहानिरिक्षक जगदीश मीणा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफ 192 बटालियनचे कमान्डंट देव राज, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, पिपली बुर्गीचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी वैभव रुपवते उपस्थित होते.
पोमकेत या सुविधा
या पोमकेत पोलिस दलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, 20 पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लॉंट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल इत्यादींची उभारणी करण्यात आली आहे. यासोबतच पोस्ट सुरक्षेसाठी गडचिरोली पोलिस दलाचे 5 अधिकारी व 61 अंमलदार, एसआरपीएफचे 1 अधिकारी व 48 अंमलदार तसेच सीआरपीएफचे 1 असिस्टंट कमांडन्ट, 9 अधिकारी व 77 अंमलदार तैनात करण्यात आले आहेत.
उद्घाटनानिमित्त जनजागरण मेळाव्याचे आयोजन
पोमकेच्या उद्घाटनाप्रसंगी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पिपली बुर्गी येथील उपस्थित नागरिकांपैकी महिलांना सलवार सुट, नव्वारी साडी, पुरुषांना धोतर, लोअर पॅन्ट, चप्पल, ब्लॅकेट, चादर, टी-शर्ट, मुलींना सायकल, नोटबुक, फ्रॉक, कंपास, चॉकेट्स, बिस्कीट, मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, व्हॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले.