लोहदगडाची वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड खाणीतील लोहदगडाची वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत एका शिक्षकाचा जीव गेल्याची घटना आलापल्ली येथील बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेसमोर शनिवारी घडली. वासुदेव कुळमेथे रा. गोमणी ता. मुलचेरा असे मृत शिक्षकाचे नाव असून ते काटेपल्ली येथील भगवंतराव आश्रमशाळेत कार्यरत होते. विशेष म्हणजे, सोमवारी आष्टी जवळ सुरजागडच्या अनियंत्रित ट्रकने एका १२ वर्षीय बालिकेचा बळी घेतला होता.
प्राप्त माहितीनुसार, वासुदेव कुळमेथे हे आपल्या दुचाकीने चंद्रपूर मार्गावरील बँक ऑफ महाराष्ट्र समोरून जात होते. दरम्यान, मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आलापल्ली येथील मुख्य चौकात घडल्याने ट्रकचालकाला नागरिकांनी पकडून ठेवले होते. काही दिवसांपूर्वी असेच एका अवजड वाहनाने आष्टी येथे १२ वर्षीय मुलीला चिरडले होते. यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.