पुन्हा अवकाळीचे संकट ; जिल्ह्यात पाच दिवस येलो अलर्ट 

पुन्हा अवकाळीचे संकट ; जिल्ह्यात पाच दिवस येलो अलर्ट 
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : मार्च व एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केल्यानंतर आता पुन्हा मे महिन्याच्या तिस-या आठवड्यात हवामान विभागाने पाच दिवस वादळी पावसाचा इशारा दिला आहे. पाऊस आल्यास सर्वसामान्य नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार असला तरी ज्या शेतक-यांचे उन्हाळी धान कापणीयोग्य झाले आहेत, त्यांना जबर फटका बसणार आहे.
यावर्षी रब्बी हंगामात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान व मका पिकाची लागवड करण्यात आली होती. मात्र पीक ऐन भरात असताना मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व एप्रिल महिनाच्या सुरुवातीपासूनच पूर्ण महिनाभर अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळासह आलेल्या अवकाळीमुळे जिवीतहानीसह मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. गारपीट व वादळी पावसाने अनेक घरांचे नुकसान केले. तसेच वज्राघाताने अनेकांचा जीव घेतला. उन्हाळी धान, मका व भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान केले. या नुकसानीची अद्यापही भरपाई मिळालेली नसताना पुन्हा अवकाळीचे संकट उभे ठाकले आहेत. सध्या बहुतेक शेतक-यांच्या धान, मका पिकाची कापणी व मळणी झाली आहे. मात्र ज्या शेतक-यांचे अद्यापही धानपीक कापणी करायचे आहेत, त्या शेतक-यांची धाकधुक वाढली आहे. अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यास या शेतक-यांचे मोठे नुकसान होणार आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या इशा-यानुसार जिल्ह्यात 20 ते 24 मे पर्यंत एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाट व वादळी वा-यासह पाऊस कोळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यादरम्यान वा-याचा वेग हा 30-40 किमी प्रती तास राहणार आहे.