महिन्यानंतर परतले रानटी हत्तींचे कळप ; ‘या’ जंगल परिसरात झाले दर्शन

GADCHIROLI TODAY

कुरखेडा : मागील महिन्यात 8 ते 10 च्या संख्येत जिल्ह्याच्या सीमेत दाखल झालेल्या रानटी हत्तींच्या कळपाने कुरखेडा तालुक्यात प्रवेश करून धुमाकूळ घातला होता. त्यानंतर हत्तींच्या कळपाने गोंदिया जिल्ह्याकडे आपला मोर्चा वळविला होता. तेथे एक महिना वास्तव्य केल्यानंतर आता हत्तींचा कळप पुन्हा कुरखेडा तालुक्यातील वडेगाव-आंजनटोला जंगल परिसरात दाखल झाला आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.
मागील महिन्यात रानटी हत्तींनी कुरखेडा तालुक्यात प्रवेश करीत शेतातील झोपडी, उन्हाळी धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. ऐन कापणीवर आलेल्या धान पिकाचे हत्तींच्या कळपाकडून नुकसान झाल्याने शेतक-यांवर आर्थिक संकट कोसळले. वनविभागाने सदर कळपावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले होते. या भागात एक- दोन दिवस राहिल्यानंतर हत्तींच्या कळपाने गोंदिया जिल्ह्यात प्रवेश केला. त्यामुळे वनविभागासह शेतक-यांनीही सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र आता पुन्हा एक महिन्यानंतर रानटी हत्तींचा कळप गोंदिया जिल्ह्यातून कुरखेडा तालुक्यात दाखल झाल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांमध्ये धाकधुकी वाढली आहे. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार वडेगाव-आंजनटोला बिट क्रमांक 159 जंगल परिसरात हत्तींच्या कळपाचे दर्शन झाले आहे. या हत्तींमुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी नजर ठेवून आहेत.