दोन दुचाकींची समोरा-समोर धडक : १ ठार तर ४ गंभीर

GADCHIROLI TODAY

कुरखेडा : दोन दुचाकींची समोरा-समोर धडक झाल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना कुरखेडा-मालेवाडा मार्गावरील गोठणगाव जवळ शनिवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. लोकेश चाफा (२७) रा. चांदोना मृतकाचे नाव असून जागेश्वर नेटी (२६), विक्रांत हुंडरा (२७) दोन्ही रा. चिचटोला, प्रशांत तुकाराम मारगाये (२०), राहुल डोंगरवार (२५) दोन्ही रा. शिवणी हे गंभीर जखमी आहेत.
प्राप्त माहितीनुसार, चिचटोला येथील तीन युवक कुरखेडा येथून स्वगावी ट्रिपल सीट जात असताना शिवनी येथील दोन युवक कुरखेडा शहराकडे जात होते. दरम्यान गोठणगाव वळणावर दोन्ही दुचाकीची समोरा-समोर जोरदार धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की, एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर चार गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच येथील सामाजिक कार्यकर्ते शहेजाद हाशमी, रोशन मेश्राम, बंटी देवढगले, आपचे तालुका संयोजक ईश्वर ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेने सर्वांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आला.