अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी कोनसरी येथील दारुमुक्त समिती सरसावली : 35 लिटर दारूसह विक्रेत्यास केले पोलिसांच्या स्वाधीन

अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी कोनसरी येथील दारुमुक्त समिती सरसावली : 35 लिटर दारूसह विक्रेत्यास केले पोलिसांच्या स्वाधीन
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथील दारूमुक्त समितीने एका दुचाकीस्वारास ३५ लिटर दारूसह पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर दारूविक्रेता अनेक दिवसांपासून गावात दारू सप्लाय करायचा. दरम्यान, ग्रामस्थांनी पहाटेच्या दरम्यान सापळा रचून त्याला चांगलाच धडा शिकवला.
आष्टी परिसरातील अनेक गावांत अवैध दारू विक्री करण्याचे प्रमाण वाढत चालले आहेत. हीच बाब कोनसरीच्या ग्रामस्थांना खटकली. त्यामुळे कोनसरी गावातील वाढता दारूचा ओघ व दारुमुळे उध्वस्त होणारे कुटुंब पाहून कोनसरी ग्रामपंचायतीने दारू बंदी करीता एक समिती गठीत केली. या समितीच्या माध्यमातून संपूर्ण तयारीने रात्री 2 वाजता पासून पहारा दिला गेला. पहाटेला 4:30 वाजता दरम्यान कमिटीने रामकृष्णपूर येथील नारायण बच्छाड या व्यक्तीस दारू भरलेल्या गाडी सहीत पकडले. गाडीवर कॅरेटमध्ये 35 लिटर मोहाची दारू सापडली. त्याला पोलिसाच्या स्वाधीन करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी आष्टी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्याशी चर्चा केली. दारू विक्री करून गावातील तरुण युवकांचे बळी घेणाऱ्या सर्व दारू विक्रेत्यांना हा शेवटचा इशारा देण्यात आला आहे. आता दारू विक्री करताना सापडल्यास कसलाही विचार न करता गुन्हा दाखल करून आपल्यावर दंड सुद्धा लावले जाईल आणि ग्रामपंचायत कडून उचित कार्यवाही केली जाईल अशी तंबीही देण्यात आली आहे. यासाठी कोनसरी गावचे सरपंच श्रीकांत पावडे, उपसरपंच रतन आक्केवार, पोलीस पाटील यशवंत मानापुरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष चंद्रकांत सोनटक्के, दारू मुक्ती समिती सदस्य रवींद्र कावडे, जयवंत कोवे व इतर सदस्यांनी मोलाचे कार्य केले.
परिसरातील सर्व सरपंचांनी गावात मताचे राजकारण करण्यापेक्षा गावाच्या विकासासाठी कार्य करावे. अवैध दारु विक्री बंद करावी. गावात कोणतेही अवैध धंदे सुरू ठेऊ नये. विकासाच्या आड येणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवावा, तरच सरपंच पदाला न्याय मिळेल आणि लोकांचा सरपंचांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल.
-श्रीकांत पावडे, सरपंच ग्रामपंचायत कोनसरी